स्वातंत्रदिनी दापोलीत उपोषणाचा इशारा 

चंद्रशेखर जोशी
Tuesday, 11 August 2020

प्रवासालाच तीन ते चार तास लागत असल्याने रुग्ण गंभीर अवस्थेतच जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहे

दाभोळ  (रत्नागिरी) : दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात येत्या चार दिवसात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीचे आ. योगेश कद्दक यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.

दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात 14 ऑगस्ट पर्यंत डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू न केल्यास दापोली येथील तहसीलदार कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दापोलीतील पत्रकार व भाजपाच्या वतीने देण्यात आला होता. या संदर्भात आ. योगेश कदम यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दापोलीसाठी डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरला परवानगी मिळालेली असून येत्या चार दिवसात हे सेंटर दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात येणार असून त्यासाठी कोणालाही उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही असेही आ. कदम यांनी सांगितले.

हेही वाचा- सिंधुदुर्गात गणेशोत्सव  साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर : के मंजुलक्ष्मी -

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसीचे तांत्रिक काम पूर्ण झाले असून या सेंटरसाठी आवश्यक असणारी औषधे व साधनसामग्री येत्या दोन दिवसात उपजिल्हा रुग्णालयात आल्यावर लगेचच हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
दापोली येथील किसान भवन येथे कोव्हीड केअर सेंटर येथे व्हेंन्टीलेटरची सुविधा नसल्याने तेथे दाखल झालेल्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्यावर त्याला पुढील उपचारासाठी 170 कि.मी. अंतर कापून रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते.

हेही वाचा-रत्नागिरीत वाळू माफियांकडून  वादळग्रस्तांची लूट -

त्यामुळे केवळ प्रवासालाच तीन ते चार तास लागत असल्याने रुग्ण गंभीर अवस्थेतच जिल्हा रुग्णालयात दाखल होत असे. या सर्व प्रकारात काही रुग्णांचा उपचार घेत असतानाच रत्नागिरी येथे मृत्यू  झाला होता. त्यामुळे दापोलीचा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू  दर वाढू नये यासाठी दापोली येथे डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरची मागणी दापोलीकरांकडून सातत्याने करण्यात येत असून दापोलीकरांच्या या प्रश्नाची  तड लावण्यासाठी पत्रकारांच्या वतीने तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी 15 ऑगस्टला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिला आहे. 

हेही वाचा- बाप्पाच्या उत्सवासाठी चाकरमान्यांना असे करावे लागणार सुट्ट्यांचे नियोजन -

निसर्ग चक्रीवादळांमुळे नुकसान झालेल्या अनेक आपदग्रस्तांच्या खात्यात अद्यापही मदत जमा झाली नसल्याबाबत आ. योगेश कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, या संदर्भात आपली राज्याचे मदत व पुनर्वसन  विभागाचे सचिव निंबाळकर यांचेशी चर्चा झाली असून दापोलीसाठी निधी तातडीने पाठविण्यात येणार असून ते तहसिलदारांच्या खात्यात जमा  झाल्यावर लगेचच आपदग्रस्तांच्या खात्यात ते जमा  करण्यात येणार आहेत. यापूर्वी एनडीआरफ या हेडमधून आपदग्रस्तांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. मदतीची बिले तहसील कार्यालयात तयार करुन ठेवण्यात आलेली असून राज्य सरकारकडून निधी जमा झाल्यावर उर्वरित वादळग्रस्तांच्या खात्यात लगेचच मदतीची रक्कम जमा  करण्यात येणार असल्याची माहिती आ. योगेश कदम यांनी दिली.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for Dedicated Covid Health Center strike warned by a journalist from Dapoli and the BJP