esakal | दिल्लीतही राज्य करतो, देवगडचा राजा; महिलांचा प्रयोग यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीतही राज्य करतो, देवगडचा राजा; महिलांचा प्रयोग यशस्वी

दिल्लीतही राज्य करतो, देवगडचा राजा; महिलांचा प्रयोग यशस्वी

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस : मिठमुंबरी (ता. देवगड) येथील अन्नपूर्णा महिला उत्पादक गटाने चालू हंगामामध्ये देवगडचा हापूस (devgad hapur salling in delhi) थेट देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विक्री करीत ‘दिल्लीतही राज्य करितो, देवगडचा राजा’ हे सिद्ध केले आहे. तब्बल आठ लाखांची उलाढाल या उत्पादक गटाने आंबा विक्रीतून करीत जिल्ह्याच्या बचत गट क्षेत्रात एक वेगळेपण (sindhudurg district) सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे आंबा विक्री करणारा उत्पादक गट (group of women salling devgad mango) म्हणून पहिला प्रयोग करीत तो यशस्वी केला आहे. त्यांचा हा प्रवास जिल्ह्यातील अन्य उत्पादक व बचत गटांना आयडॉल ठरणारा आहे.

मिठमुंबरी येथील १५ महिलांनी १ जानेवारी २०२० ला एकत्र येत अन्नपूर्णा उत्पादक गट स्थापन केला. अध्यक्षा तन्वी गांवकर व सचिव रेश्‍मा डामरी यांच्या नेतृत्वाखाली व सदस्या सोनाली गांवकर यांच्या सक्रिय सहभागामुळे अल्पावधीत या उत्पादक गटाने आर्थिकदृष्ट्या ऊर्जितावस्था निर्माण केली आहे. १५ महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय करणे किती फलदायी असते, याचे महत्त्व पटल्याने व त्याप्रमाणे कृती केल्याने त्यांना हे यश संपादन करता आले आहे.

हेही वाचा: मच्छीमारांचे पॅकअप: समुद्रातील पाण्याला करंट

मुळात देवगड म्हणजे आंबा व्यवसाय हे समीकरण आहेच. या पारंपरिक व्यवसायाला या महिलांनी उत्पादक गटाच्या माध्यमातून सहकाराची जोड दिली. या महिलांना मुंबई, गोवा, सांगलीसारख्या शहरात आंबा विक्री करण्याच्या व्यवस्थापनाचे ज्ञान होतेच. यावेळी त्यांनी थोडे धाडस करीत दिल्लीपर्यंत मजल मारली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत अन्नपूर्णा उत्पादक गटाची स्थापना झाली आहे. गेल्या १६ महिन्यांत या उत्पादक गटाला ५० हजाराचे स्थिर आणि दीड लाखाचे खेळते भांडवल मिळाले.

कृषी क्षेत्रातील उत्पादन घेवून विक्री करणाऱ्या कंपनीची माणसे एक दिवस जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार यांच्या कार्यालयात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत विचारले असता अन्नपूर्णा महिला उत्पादक गट विक्रीसाठी आंबा पुरवू शकते, हे पुढे आले. अन्नपूर्णा गटाने सुद्धा यात झोकुन देत कामाला सुरुवात केली. उत्पादक गटातील महिलांच्या आंबा बागेत सेंद्रीय व नैसर्गिकरित्या वाढविलेल्या आंबा वृक्षाची फळे पिकवून ती या कंपनीला विक्रीसाठी दिली.

दीड लाखाचा निव्वळ फायदा (net profit)

देवगड ते रत्नागिरी टेम्पो वाहतूक करीत हे आंबे रेल्वेने दिल्लीला नेले. तेथे या कंपनीने विक्री केली. यातून तब्बल आठ लाखांची उलाढाल झाली आहे. दीड लाख रुपये निव्वळ आर्थिक फायदा या गटाला झाला. यासाठी त्यांना जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार, देवगड तालुका व्यवस्थापक शिवाजी खरात, देवगड तालुका समन्वयक हेमंत हळदणकर यांचे सहकार्य लाभले. एकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला कोणताही चॅलेंजिंग व्यवसाय करू शकतात, हे या गटाने सिद्ध केले.

हेही वाचा: व्यथा कुटुंबाच्या; मी रक्ताच्या नात्यातील सात माणसं गमावलेत

"देवगड हापूस दिल्लीत विक्री करण्याचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. जिल्हा व्यवस्थापनाने चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने सहकार्य मिळाले. पुढील हंगामात प्रक्रिया केलेला काजू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजन आतापासून सुरू केले आहे."

- तन्वी गांवकर, अध्यक्षा, अन्नपूर्णा उत्पादक गट, मिठमुंबरी