Ganpatipule Tourism : पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे

कडकडीत ऊन; पुढील आठवड्यात पर्यटकांचा राबता वाढण्याची शक्यता
Ganpatipule Tourism
Ganpatipule Tourism sakal

रत्नागिरी : दिवाळीची सुटी सुरू झाली. पर्यटनाच्या नव्या हंगामात पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे वळू लागली आहेत. मागील आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे पर्यटकही कोकणातील पर्यटनस्थळांवरील लॉजिंगधारकांकडे चौकशी करून नियोजन करू लागले आहेत. दिवाळीचे दोन दिवस जिल्ह्यात कडकडीत ऊन पडल्यामुळे पुढील आठवड्यात पर्यटकांचा राबता वाढण्याची शक्यता आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर दिवाळी सुटीला आरंभ झाला. त्यामुळे चाकरमान्यांची पावले आपसुकच कोकणातील गावाकडे वळलेली आहेत. मुंबई, पुण्यासह परजिल्हावासीय पर्यटनाचे वेळापत्रक बनवू लागले आहेत. अनेक जण दिवाळीपूर्वी फिरायला जाण्याची ठिकाणे निश्‍चित करून निवासाचे ऑनलाइन आरक्षण करून ठेवतात. यंदा मागील आठवडाभर राज्यभरात मुसळधार पाऊस पडत होता.

रत्नागिरी जिल्ह्यातही परिस्थिती तशीच होती. त्यामुळे अनेकांनी निवासाचे आरक्षण केलेले नाही. ते पावसाच्या परिस्थितीचा दूरध्वनीवरून आढावा घेत आहेत. त्यावरच फिरण्यासाठी कुठे जायचे ते अवलंबून राहिले आहे. यावर्षी बहुसंख्य पर्यटक कुटुंब आरक्षण न करताच थेट त्या-त्या ठिकाणी फिरायला बाहेर पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. याला गणपतीपुळेतील व्यावसायिकांकडूनही दुजोरा मिळत आहे. मागील आठवड्यात काही पर्यटकांनी पावसाची परिस्थिती पाहून आरक्षण रद्द केली होती. दूरवरून येणार्‍यांपेक्षा पश्‍चिम महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक वन डे ट्रिपचे नियोजन करत आहेत. त्यामुळे प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची उपस्थिती अन्य दिवसांपेक्षा लक्षणीय आहे. गेले दोन दिवस चार ते पाच हजार पर्यटक येऊन गेल्याची नोंद गणपती मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये झाली.

अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज आटोपली की, दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक बाहेर पडतात. बुधवारी (ता. २६) भाऊबीज आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने पर्यटनाला आरंभ होईल, असा अंदाज आहे. वातावरणाचा अंदाज घेऊनच पर्यटक फिरण्याची ठिकाणं ठरवतील असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गणपतीपुळे, गुहागर, दापोलीतील किनारी भागांसह धार्मिक पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा अधिक राहील, असा अंदाज आहे.

भाऊबीज झाल्यानंतर पर्यटकांची ये-जा गणपतीपुळेत सुरू होणार आहे. पावसाचे वातावरण सरले असून दिवसभर कडकडीत ऊन पडलेले आहे. फिरण्यासाठी पूरक परिस्थिती आहे.

- भालचंद्र नलावडे, व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com