esakal | ...अखेर वीस वर्षांचे स्वप्न साकार; खारेपाटणमध्ये थांबली रेल्वे
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे

...अखेर वीस वर्षांचे स्वप्न साकार; खारेपाटणमध्ये थांबली रेल्वे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारेपाटण : गेल्या वीस वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या खारेपाटण रेल्वे स्थानकाचे स्वप्न आज पूर्ण झाले. स्थानक पूर्णत्वानंतर आज प्रथमच सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस गाडी या स्थानकात थांबली. या एक्सप्रेसचे खारेपाटण रेल्वे स्थानक संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी तसेच खारेपाटण दशक्रोशीतील शेकडो नागरिकांनी जोरदार स्वागत केले. तर जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिवा एक्सप्रेस गाडीच्या मोटरमनचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

हेही वाचा: चिपळूणमध्ये 25 जवानांसह NDRF ची टीम दाखल

खारेपाटण रोड स्थानकाला तीन वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. तर सहा महिन्यापूर्वी स्थानकाची उभारणी पूर्ण झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवा एक्सप्रेस या गाडीला या स्थानकात थांबा मिळाला आहे. आज सव्वा दहाच्या सुमारास .सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस खारेपाटण स्थानकात दाखल झाली. या गाडीचे स्वागत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा परिषद स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र जठार, पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, खारेपाटण रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिर काझी, सचिव सूर्यकांत भालेकर आदींनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप तळेकर, रत्नप्रभा वळंजू, चिंचवली उपसरपंच अनिल पेडणेकर, कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, नडगिवे उपसरपंच अरुण कर्ले, खारेपाटण तालुका कृती समितीचे पदाधिकारी मंगेश गुरव, रवींद्र मांजरेकर, संतोष पाटणकर, चिंचवली तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर भालेकर आदी मान्यवर तसेच दशक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

खारेपाटणवासियांचे रेल्वे स्थानकाचे गेल्या वीस वर्षाचे स्वप्न आज पूर्ण झाल्याचे समाधान नागरिकांची यावेळी व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी श्रीफळ वाढवून स्थानकाचा शुभारंभ केला. तसेच दिवा एक्सप्रेसचे स्वागत केले. यावेळी खारेपाटण स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिर काझी, रविंद्र जठार, सूर्यकांत भालेकर यांनी रेल्वे इंजिनाला पुष्पहार अर्पण केला. तर संजना सावंत यांनी मोटारमनचे स्वागत केले.खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन येथून पहिला प्रवास करण्याचा मान चिंचवली भंडारवाडी येथील रहिवासी निकष वैजनाथ मगर यांना मिळाला. त्यांनी खारेपाटण ते पनवेल असे खारेपाटण रेल्वे स्टेशनवरून ऑनलाइन तिकीट घेऊन सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाडीने प्रवास केला. श्री. मगर यांना खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील प्रवासाकरीता शुभेच्छा देण्यात आल्या. कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर सतीश कुंभार यांचेही खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या पदाधिकर्‍यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

हेही वाचा: सिंधुदुर्गात गणेशोत्‍सवासाठी चाकरमान्यांचा ओघ सुरू

“खारेपाटण दशक्रोशीतील ग्रामस्थांनी गेली २० वर्षे रेल्वे स्टेशनसाठी लढा सुरू ठेवला होता. त्याला आज खर्‍या अर्थाने आज यश आल्याचे मोठे समाधान आहे. खारेपाटण रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड व वैभववाडी तसेच रत्नगिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यासह आजूबाजूच्या सुमारे ५० ते ६० गावांना खारेपाटण रेल्वे स्टेशन फायदा होणार आहे. भविष्यात हे रेल्वे स्टेशन दशक्रोशीतील नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीचे केंद्रबिंदू ठरणार आहे. आता या रेल्वे स्टेशनला आवश्यक असणारा प्लटफॉर्म बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत.”

- नासीर काझी, खारेपाटण रोड रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष

loading image
go to top