अबब ! खासगी वाहतुकदारांनी केली इतकी वाढ; एसटी बंदचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

गणेशोत्सवात कोकणात महाराष्ट्रातील विविध आगारातून शेकडो एसटी बसेस येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी सुरू होईल, असा चाकरमान्यांचा अंदाज होता. परंतु अजुनही एसटी व्यवस्थापनाने गाड्या सुरू करण्याचे धोरण निश्‍चित केलेले नाही.

गुहागर ( रत्नागिरी ) - गणेशोत्सवात केवळ एका बाजूनेच व्यवसाय मिळतो आणि एक फेरी तोट्यात जाते. तसेच आधी प्रलंबित पगार द्या तरच काम करू, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली तर अडचणी वाढतील. त्यामुळे एसटी व्यवस्थापन राज्यात फेऱ्या करायला तयार नाही. परिणामी सध्या खासगी प्रवासी वाहतुकीचे दर दुप्पट, तिप्पट झाले आहेत. 

जिल्हांतर्गत बससेवा सुरू असली तरी या सेवेचे स्वरुप अजुनही विस्कळित आहे. मुंबईतील लोकल ही जशी कष्टकरी वर्गाची लाईफलाइन आहे. तशीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी लाईफलाइन आहे. शाळा सुरू असताना प्रत्येक गावात सकाळी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी जात असे. मात्र कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने अनेक गावात 23 मार्चनंतर एसटी आलेली नाही. सध्या जिल्ह्यातील मुख्य गावापर्यंतच एसटी सुरू आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर या मार्गावर एसटीचा व्यवसाय होतो. मात्र जिल्हाबंदी असल्याने लांब पल्ल्याची वाहतूक बंद आहे. 

गणेशोत्सवात कोकणात महाराष्ट्रातील विविध आगारातून शेकडो एसटी बसेस येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी सुरू होईल, असा चाकरमान्यांचा अंदाज होता. परंतु अजुनही एसटी व्यवस्थापनाने गाड्या सुरू करण्याचे धोरण निश्‍चित केलेले नाही. मुळात गणेशोत्सवात प्रवासी वाढत असले, तरी ते एकाच मार्गावर वाढतात. गणेशोत्सवापूर्वी मुंबई, पुण्यातून कोकणात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यावेळी कोकणातून कोणीही शहरांकडे जात नाही. त्यामुळे मुंबई, पुण्यात जाताना एसटीला तोटा सहन करावा लागतो. 

एसटीच्या अडचणींचा खासगीस फायदा 

गणेशोत्सवानंतर कोकणात आलेल्या चाकरमान्यांची शहरांकडे जाण्याची लगबग सुरू होते. त्यावेळी शहरातून रिकामी एसटी कोकणात परतते. यामुळे एकतर्फी व्यवसाय करून तोटा वाढविण्याची मानसिकता एसटी व्यवस्थापनाची नाही. तसेच कर्मचाऱ्यांना एसटीने जूनपासून पगार दिलेला नाही. गणेशोत्सवाच्या हंगामात एसटी सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पगारासाठी आंदोलनाची भूमिका घेतली तर एसटी व्यवस्थापन अडचणी येईल. एसटीच्या या अडचणींचा फायदा खासगी प्रवासी वाहतुकदार करून घेत आहेत. जुलै अखेरपर्यंत गुहागर-मुंबई भाडे दोन हजार रुपये होते. ऑगस्टमध्ये या भाड्यात 500 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी हेच भाडे साडेतीन हजारपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due To ST Closure Rates Of Private Transport Increased So Much