रत्नागिरीतील घटना : विजेच्या धक्क्याने वायरमन खांबाला चिकटला

राजेश शेळके
Wednesday, 7 October 2020

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरल घटना; अधिक उपचारासाठी कोल्हापुरला हलविले

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील डीपी पोलवर दुरुस्तीसाठी चढलेल्या महावितरणच्या वायरमनला विजेचा जोरदार धक्का बसला. यामुळे तो तिथेच चिकटून बसल्याने गोंधळ निर्माण झाला. विद्युत पुरवठा खंडित करून पालिकेच्या अग्निशमन दलाने मोठ्या शर्थीने त्या कर्मचार्‍याला उतरवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने आज पहाटे त्याला उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले. काल (ता. 6) रात्री साडे दहा वाजण्याच्या सूमारास ही घटना घडली.

सुभाष पुंडलिक भोंगले (वय 40) असे त्या शॉक लागलेल्या वरिष्ठ वायरमनचे नाव आहे. 80 फुटी हायवेवरील महावितरण हार्बर कार्यालयात ते कार्यरत आहेत. काल रात्री शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डीपी पोलवर ते दोष शोधण्यासाठी चढले होते. पण तो मिळत नव्हता आणि वीज प्रवाह अचानक सुरू झाला की तो आधीच सुरू होता हे समजू शकलेले नाही. परंतु त्यांना पोलवरच विजेचा जोरदार धक्का बसला आणि 15, 20 मिनिटे ते  चिकटून होते. त्यानंतर महावितरण कर्मचारी आणि पालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या खोर्‍यामध्ये बसून कर्मचारी पोलावर पोचले आणि त्यामध्ये उतरवून उपचारासाठी जखमीला लोटलीकर हॉस्पिटलला दाखल करण्यात
आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.

हेही वाचा- पिढ्यान पिढ्या असनिये गाव रोगांपासून दूर -

आपत्कालीन यंत्रणेचा पुन्हा पंचनामा

जिल्हा प्रशासनाची स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा असावी, यासाठी वारंवार प्रसारमाध्यमांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी केली. मात्र राजकारण्यांप्रमाणे त्याला उत्तरं मिळतात आणि हा विषय पुन्हा मागे पडतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कालची ही घटना घडली.  त्या व्यक्तीला मदत मिळत नाही, ही केवढी शोकांतिका आहे. मग प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा गेली कुठे. पालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु त्यांनाही मर्यादा पडल्या. याची तांत्रिक माहिती नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेचा पंचनामा झाला असून आतातरी यावर उपाययोजना केली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electric shock caused the wireman to stick to the pole