esakal | लाखोचा निधी वाया; कोकणातील 'या' जैवविविधता पार्कचे बनले जंगल
sakal

बोलून बातमी शोधा

लाखोचा निधी वाया; कोकणातील 'या' जैवविविधता पार्कचे बनले जंगल

पार्कची निर्मिती ज्या उद्देशाने करण्यात आली तो उद्देशही सफल झालेला दिसत नाही. निर्मितीसाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा निधी खर्चही वाया गेला आहे.

लाखोचा निधी वाया; कोकणातील 'या' जैवविविधता पार्कचे बनले जंगल

sakal_logo
By
- नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : सामाजिक वनीकरण विभागामार्फत रानबांबुळी येथे ‘जैवविविधता पार्क’ची निर्मिती करण्यात आली; मात्र सद्यस्थितीत हा पार्क दुर्लक्षित झाल्याने या पार्कची दुरवस्था होऊन जंगलसदृश स्थिती पाहायला मिळत आहे. या पार्कची निर्मिती ज्या उद्देशाने करण्यात आली तो उद्देशही सफल झालेला दिसत नाही. निर्मितीसाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा निधी खर्चही वाया गेला आहे.

उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात निसर्ग संरक्षण करणारे जैवविविधता पार्क उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथे सामाजिक वनीकरण विभागामार्फत जैवविविधता पार्कची निर्मिती करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या या पार्कच्या स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. सद्यस्थितीत या पार्कमध्ये लावण्यात आलेल्या विविध औषधी वनस्पतीपेक्षा जंगली झुडपे आणि गवत दिसत आहे.

हेही वाचा: वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल - नितिन राऊत

सामाजिक वनीकरण विभागातर्फे विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. यामध्ये उत्तमराव पाटील उद्यान योजनेचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील वन आणि वनेतर जमिनीत जैवविविधतेसह निसर्ग संवर्धनासाठीचे प्रकल्प राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्यानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा प्रकल्प जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीलगत असलेल्या रानबांबुळी येथे १५ एकर जागेत उभारण्यात आला आहे. या जैवविविधता पार्कमध्ये औषधी वनस्पती उद्यान, फुलपाखरू उद्यान, दीक्षा उपदिषा उद्यान, स्मृतीवन ,बांबू लागवड करून या फार्ममध्ये येणाऱ्यांना तेथील प्रत्येक झाडाचे नाव समजावे यासाठी संबंधित झाडाच्या नावाचे फलक तसेच या ठिकाणी पर्यावरण अभ्यासाला चालना देणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे.

सामाजिक वनीकरण विभागातर्फे रानबांबुळी येथे उभारण्यात आलेल्या या जैवविविधता पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे; मात्र त्यानंतर या उद्यानातील झाडांची देखभाल आणि उद्यानाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला दिसत आहे. सद्यस्थितीत या पार्कमध्ये औषधी झाडांपेक्षा जंगली झाडे तसेच मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले दिसत आहे. त्यामुळे ज्यांना लाभ मिळावा, अशा ज्येष्ठ नागरिक मुले आणि पर्यटक, पर्यावरण अभ्यासक कोणी या इकडे फिरकलेले दिसत नाहीत. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाल्याने शासनाची मूळ संकल्पनाच बाजूला पडली आहे. केवळ निधी खर्च करण्यासाठीच हा प्रकल्प राबविला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार PFचे व्याज?

यंत्रणाच नसल्याचा फटका

सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण सिंधुदुर्गनगरीचा विकास करण्यासाठी व येथील लोकांना विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले गेले; मात्र या प्रकल्पांच्या देखभाल व संगोपनासाठी यंत्रणा उभारण्यात आली नाही. सिंधुदुर्गनगरीत अनेक प्रकल्प होऊनही ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी मनोरंजन करण्यासारखी एकही सुरक्षित आणि स्वच्छ जागा नाही. सध्या बालकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाच्या साधनांचा अभाव जाणवतो. ही उणीव भरून काढण्यासाठी या पार्कची निर्मिती झाली.

जंगली जनावरेच जास्त

या पार्कमध्ये बालोद्यान तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी काही वेळ विश्रांती घेता यावी, यासाठी ज्येष्ठ नागरिक पार्क निर्माण करण्याची संकल्पना होती. या पार्कमध्ये सर्वांना मुक्त फिरता यावे यासाठी पायवाटेची सुविधा उपलब्ध करण्यात येणार होती; मात्र सद्यस्थिती पाहता जंगली जनावरांव्यतिरिक्त तिथे कोणीच जात नसल्याचे दिसून येते. दाभाचीवाडी तलावाकाठी वसलेल्या या जैवविविधता पार्ककडे प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा: 'नाझी जर्मनीत हेच व्हायचं'; सरकारी प्रचाराच्या चित्रपटांवर नसीरुद्दीन शाहांचं परखड मत

"सिंधुदुर्गनगरीमध्ये प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभारले गेले; मात्र या प्रकल्पांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आणि हे प्रकल्प कायम टिकून ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. सिंधुदुर्गनगरी येथे अशाच एका जैवविविधता पार्कची निर्मिती झाली; मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्प देखभलीसाठी यंत्रणा गरजेची आहे."

- सुशील निब्रे, ओरोस

loading image
go to top