बेड नाही, ऑक्‍सिजन नाही, एचआरसीटीसाठी मात्र भरमसाट शुल्क

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

संकटातही डॉक्‍टरांचचलती; चिपळुणात चाचणीसाठी वेगवेगळे दर, शिफारशीच नाहीत

चिपळूण : चिपळूण तालुक्‍यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही की ऑक्‍सिजनची व्यवस्था होत नाही. अशा संकटकाळात डायग्नोस्टिक सेंटरकडून छातीच्या सीटी स्कॅनसाठी (एचआरसीटी) भरमसाट शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क गोरगरीब व सामान्य रुग्णांच्या आवाक्‍याबाहेरील आहे. त्यातही शहरातील विविध सेंटरमध्ये चाचणीचे दर वेगवेगळे आहेत. काही सेंटरमध्ये तर डॉक्‍टरांच्या शिफारशी शिवायच एचआरसीटीच्या चाचण्या केल्या जात आहेत.

हेही वाचा - बिबट्याची हुलकावणी ; बारा दिवसांनंतरही पिंजरा रिकामाच 

चिपळुणात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू आहे. गेल्या दोन महिन्यात तर कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. दररोज शंभर ते सव्वाशे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या संसर्गात सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे सुरवातीला आढळतात. त्यानंतर संसर्ग फुफ्फुसापर्यंत जातो. त्यामुळे अशा रुग्णांना एचआरसीटी टेस्ट करण्यास डॉक्‍टरांकडून सल्ला दिला जातो. बहुतांश नागरिकांना एचआरसीटी टेस्टची माहिती झाली आहे. त्यामुळे अनेकजण आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच एचआरसीटी टेस्ट करीत आहेत. त्यामुळे शहरातील डायग्नोस्टिक सेंटर्सकडे संकटकाळात गर्दी आहे.

विविध चाचण्यांसाठी शासनाने दर निश्‍चित केले आहेत. त्यात स्पष्टता नाही, त्याचा फायदा घेतला जात आहे. एचआरसीटी टेस्टसाठी काही रुग्णालयात पाच हजार तर काही डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ६ ते ७ हजार रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे या शुल्कावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय एचआरसीटी चाचणीला मनाई केली आहे. तरीही आधार कार्डवर ही चाचणी केली जात आहे. 

हेही वाचा -  जठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत 

"चिपळुणातील काही सेंटरर्समध्ये सीटी स्कॅनची व्यवस्था आहे. एचआरसीटी टेस्टसाठी या सेंटरमध्ये वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे. माझे नातेवाईक ज्या रुग्णालयात उपचार घेत होते, त्या ठिकाणी एचआरटीसी टेस्टचे शुल्क ५ हजार २०० होते. हे मला जास्त वाटले म्हणून मी दुसऱ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेलो, तेथे माझ्याकडून साडेसहा हजार रुपये आकारले."

 - रियाज चौगुले, चिवेली

"कोरोना काळात जर एखादे रुग्णालय जादा शुल्क घेत असतील तर नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली पाहिजे. त्यानंतर आम्ही निश्‍चितपणे त्याबाबत चौकशी करून कारवाई करू."

 - तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार, चिपळूण

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra fees received for HRCT in various centres in ratnagiri