रत्नागिरीत जनता कर्फ्यूसाठी बळीराजाचा प्रपंचासह सहभाग....

सचिन माळी
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना साखळी नष्ट करण्यासाठी पुकारलेल्या जनता कर्फ्युसाठी ग्रामीण भागातील शेतकरीही सहभागी झाला.. 

मंडणगड (रत्नागिरी) :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला मंडणगड तालुक्यातुन जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शहरात मंडणगड नगरपंचायतीच्या वतीने इट्स नॉट कर्फ्यु, इट्स केअर फॉर यु सांगत जनता कर्फ्युचे आरोग्याविषयी असणारे महत्व समजावून जनजागृतीचा नारा देण्यात आला. 

कोरोना साखळी नष्ट करण्यासाठी पुकारलेल्या जनता कर्फ्युसाठी ग्रामीण भागातील शेतकरीही सहभागी झाला असून शेतकऱ्यांनी सुरू असलेल्या शेतीची कामे आज बंद ठेवल्याचे चित्र दिसून आले. सद्या शेतकरी भाजावळी, मशागत अशा कामांमध्ये व्यस्त आहे. कधीही सुट्टी न घेणारा शेतकरी आज मात्र देशहितकारक उपक्रमांत सहभागी झाला.

हेही वाचा- चिपळूणात कर्फ्यूला जनतेची संयमाने साथ...

शेतकरी देशहितकारक उपक्रमांत

कोकणात प्रमुख पीक असणाऱ्या भात, नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्याची पूर्वतयारी म्हणून अजूनही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. भाजावळीसाठी लागणारे कवल, गवत, पालापाचोळा जमा करून मार्च महिन्यात त्याची भाजावन करतो. अशी कामे तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू आहेत. मात्र जनता कर्फ्युची आवश्यकता आणि महत्व जाणून शेतकऱ्यांनी या कामांना बगल देत घरातच राहणे पसंत केले.

हेही वाचा-Photo : इट्स केअर फॉर यु ; मंडणगडला उत्स्फूर्त प्रतिसाद...

जनावरेही गोठयातच

घरातील साफसफाई, स्वछता, भांड्यांची साफसफाई अशा कामांना पसंती दिली. आपल्या पाळीव जनावरांनाही गोठ्यात बांधून गवत, पेंढ्याची व्यवस्था केल्याचे अनेक गावांतून चित्र आहे. त्यामुळे कोरोनाला नष्ट करण्याची मोहिमेत शेतकरी राजा उतरल्याने ग्रामीण भागातील शेतीची दैनंदिन कामांना ब्रेक लागला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer response to janta curfew Mandangad kokan marathi news