esakal | ....अन्यथा समुद्रात मासेमारी करता येणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Fisheries Department investigations underway Inspection of 70 boats in the district appointment of squad

मत्स्य विभागाची तपासणी सुरू; जिल्ह्यातील ७० नौकांची तपासणी, पथकाची नियुक्ती

....अन्यथा समुद्रात मासेमारी करता येणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मत्स्य दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने मच्छीमारांना विशिष्ट आसाची जाळी वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य विभागाकडून नौकांवरील जाळ्यांची तपासणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ७० मच्छीमारी नौकांची पथकाकडून तपासणी झाली आहे. त्या पथकाकडून दिलेले सर्टीफिकेट भविष्यात ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्या शिवाय समुद्रात मासेमारी करता येणार नाही, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.

डॉ. सोमवंशी समितीच्या शिफारशीनुसार ५ फेब्रुवारी २०१६ला पर्ससिन, रिंगसीन (मिनी पर्ससिन) मासेमारीवर प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्ससिन परवानाधारक नौकांवर निर्बंध घालण्यात आली आहेत. त्याचबरोबर मासेमारी करताना ५०० मीटर लांब, ४० मीटर उंची, २५ मि.मी.पेक्षा कमी नसलेल्या आसाच्या पर्ससिन जाळ्याने मासेमारी करण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हा कालावधी निश्‍चित करून दिला आहे. या निकषांचे उल्लंघन केले जात असून त्यामुळे मत्स्य दुष्काळाला आमंत्रण मिळत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शासनाने कडक निर्देश दिले आहेत.

हेही वाचा- महिलांनो सावधान ;  सायबर गुन्हेगारांचा ग्रामीण भागात होतोय अटॅक

गेल्या महिन्यामध्ये नौकांवरील जाळ्याची तपासणी करून त्यांना तसे सर्टीफिकेट मत्स्य विभागाकडून दिले जाणार आहे. ते सर्टीफिकेटही त्या नौकांची ओळख ठरणार आहे. त्याची अंमलबजावणी गेले काही दिवस रत्नागिरीत सुरू झाली आहे. त्यासाठी सहाय्यक मत्स्य विभागाकडून शासनाच्या नियमानुसार पथक तयार केले आहे. त्यात परवाना अधिकारी, मत्स्य व्यवसाय अधिकारी, पोलिस, मच्छीमार संघाचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौकांवर जाऊन हे पथक जाळ्यांची तपासणी करत आहे. आतापर्यंत रत्नागिरी तालुक्‍यातील सुमारे ७० बोटींची तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

हेही वाचा- वाहतूक परवाना लाच प्रकरणी दापोलीचे वनपाल निलंबित

शासनाच्या आदेशानुसार समुद्रात मासेमारीसाठी जावयाचे असेल तर पथकाने दिलेले तपासणीचे सर्टिफिकेट अत्यावश्‍यक आहे. ते नसेल तर संबंधित नौकांविरोधात कारवाई केली जाणार आहे.
- नागनाथ भादुले, सहाय्यक मत्स्य आयुक्‍त

जाळ्यांचे निकष व कालावधी
  ५०० मीटर लांब, ४० मीटर उंची
  २५ मि.मी.पेक्षा कमी आस नसावा
  १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरचा काळ
  तपासणी करून मिळणार सर्टिफिकेट

संपादन - अर्चना बनगे

loading image