वाहतूक परवाना लाच प्रकरणी दापोलीचे वनपाल निलंबित

Forest Ranger Ganesh Gangadhar Khedekar was suspended by the Chief Conservator of Forests Kolhapur by an order
Forest Ranger Ganesh Gangadhar Khedekar was suspended by the Chief Conservator of Forests Kolhapur by an order

दाभोळ (रत्नागिरी)  : लाकूड व्यावसायिकाकडून वाहतूक परवाना देण्यासाठी लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झालेले दापोलीचे वनपाल गणेश गंगाधर खेडेकर यांना मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांनी एका आदेशाद्वारे निलंबित केले.  दापोली वनपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार दापोलीचे वनपाल तौफिक रमजान मुल्ला यांच्याकडे देण्याचेही आदेश मुख्य वनसंरक्षक यांनी काल (10)  दिले आहेत.


दापोलीतील एका लाकूड व्यावसायिकाकडून वाहतूक परवाना देण्यासाठी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांनी 6 हजार 500 रुपये मागितले  होते मात्र  5 हजारांची तडजोड करण्यात आली होती. 3 सप्टेंबर रोजी वनपाल दापोली कार्यालयात वनपाल गणेश खेडेकर यांच्या सांगण्यावरून 5 हजारांची लाच घेताना खाजगी व्यक्ती  सचिन आंबेडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. 4 सप्टेंबर रोजी वनपाल गणेश खेडेकर व  सचिन आंबेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या दोन संशयितांना खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.  न्यायालयाने या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक यांनी 4 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील मुख्य  वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडे अहवाल पाठविला होता. या अहवालाच्या आधारे दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांना 4 सप्टेंबर पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक यांनी काढले असून निलंबनाच्या कालावधीत  वनपाल गणेश खेडेकर यांचे मुख्यालय  वनक्षेत्रपाल सातारा यांचे कार्यालय ठेवण्यात आले असून  उपवनसंरक्षक सातारा यांचे परवानगीशिवाय खेडेकर यांना मुख्यालय सोडता येणार नाही असेही या आदेशात म्हटले आहे.  


दरम्यान  खेडेकर यांना निलंबित केल्याने वनपाल दापोली या पदाचा अतिरिक्त कार्यभार  तौफिक मुल्ला यांच्याकडे देण्यात यावेत असेही मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट  बेन यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com