शेखर निकम पूर्ण करणार मधु दंडवतेंचे 'ते' स्वप्न 

Funds are approved for Harpude Kundi and Nairi Nivali Ghat roads
Funds are approved for Harpude Kundi and Nairi Nivali Ghat roads

चिपळूण - हरपुडे-कुंडी आणि नायरी-निवळी घाट रस्त्यासाठी चिपळूण-संगमेश्‍वरचे आमदार शेखर निकम यांनी दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे. घाट रस्त्यासाठी आवश्यक वनजमीने सर्वेक्षण व भूसंपादन करून घेण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आला आहे. या रस्त्यांसाठी माजी खासदार कै. मधु दंडवते यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे शेखर निकम आता कै. मधु दंडवते यांचे स्वप्न पूर्ण करणार आहेत. 

सध्या देवरूखमधील साखरपा येथून आंबा घाटमार्गे पश्‍चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी रस्ता आहे. देवरूख आणि संगमेश्‍वर पश्‍चिम महाराष्ट्राच्या अधिक जवळ यावे यासाठी सिंधुदुर्गचे माजी खासदार कै. मधु दंडवते यांनी निवळी, पाचांब, नेरद मार्गे पाटण घाट रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या प्रयत्नाला पुरेसे यश आले नाही. गेली अनेक वर्ष हा रस्ता लाल फितीत अडकला होता. आमदार शेखर निकम यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौर्‍यावर आले होते. सिंधुदुर्ग येथे त्यांनी कोकणच्या विकासावर लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत शेखर निकम यांनी निवळी, पाचांबे, नेरद मार्गे पाटण घाट रस्त्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. साखरपामार्गे कोल्हापूरला जाता येते. मात्र पाटणला जायचे असल्यास चिपळूणमार्गे किंवा कोल्हापूरमार्गे जावे लागते. त्यामुळे हा रस्ता झाल्यास सातारा जिल्हा संगमेश्‍वरच्या आणखी जवळ येणार आहे. हे निकमांनी पटवून दिले. त्याशिवाय कुंडी - हरपुडे घाट झाल्यास सांगली जिल्ह्यात सहज प्रवेश करता येणार आहे. मात्र दोन्ही घाट रस्त्यांच्या मार्गावर शासकीय वन जमीन आहे. तिचे सर्वेक्षण करून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार निकम यांनी दहा कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. संगमेश्‍वर, कसबा, नायरी, निवळी येथील वन जमिनीचे सर्वेक्षण करून भूसंपादनासाठी पाच कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच देवरूख, हरपुडे, कुंडी येथील जमिन जमिनीचे सर्वेक्षण करून भूसंपादन प्रक्रियेसाठी पाच कोटी मंजूर करण्यात आले आहेत. 

कुंडी आणि निवळी घाट रस्त्यासाठी माजी खासदार कै. दंडवते आग्रही होते. त्यासाठी आवश्यक वन जमीन ताब्यात येणे गरजेचे आहे. त्यासाठी आता दहा कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. ही जमीन ताब्यात आल्यानंतर रस्त्यासाठी आवश्यक निधी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून पुढील टप्यात उपलब्ध करून घेणार आहे. 

-शेखर निकम, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com