
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक परिस्थितीमुळे रात्री सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. आता पावसाचा जोर कमी झाला असून, दरडी कोसळण्याचे प्रकारही थांबले आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो चाकरमान्यांचे परशुराम घाटातून आगमन होणार आहे. त्यामुळे विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देत आजपासून परशुराम घाटातील वाहतूक २४ तास सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. परशुराम घाटात जुलै महिन्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने जीवितहानी टाळण्यासाठी घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. अतिवृष्टीत दोन वेळा दरडी कोसळल्या, मात्र त्यानंतर अशा घटना घडलेल्या नाहीत.
लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, परिसरातील शाळा महाविद्यालये व विविध राजकीय पक्षांनी महामार्ग नियमित सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सकाळी ६ ते सायंकाळी ७ दरम्यान घाट सुरू केला, मात्र रात्रीच्या वेळी घाट बंद ठेवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला आहे. शिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो चाकरमानी या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार आहेत. चाकरमानी गावाकडे येत असल्याने महामार्गावरील वाहतूकदेखील वाढली, मात्र रात्रीच्या वेळी घाट बंद राहिल्याने त्यांची मोठी गैरसोय सुरू आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गसह संबंधित शासकीय यंत्रणेकडून घाटासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला होता. त्यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना सुचवत घाटातील वाहतूक सुरू करण्यास ग्रीन सिग्नल दिला. घाटातील दरडप्रवण क्षेत्रात रात्री पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.
ठेकेदार कंपनीने रात्री नियमितपणे पेट्रोलिंग करावे, दरडप्रवण क्षेत्रात जेसीबी, क्रेन, पोकलेन अशा अत्यावश्यक सेवा २४ तास उपलब्ध ठेवाव्यात, नेमण्यात आलेल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीचे कर्मचारी, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी तैनात ठेवावेत. दरडग्रस्त भागात धोक्याचे फलक लावावेत. दरडप्रवण क्षेत्रात मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या फेन्सिंगप्रमाणे फेन्सिंग करावे. घाटात सरंक्षक भिंती, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. बंदोबस्ताच्या ठिकाणी पेडॉल, पाणी व विजेची व्यवस्था करावी. रेड अलर्ट व अतिवृष्टीवेळी वाहतूक वळवण्याबाबत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्गकडून घाटात जेसीबी, क्रेन, मनुष्यबळ, सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आदींची व्यवस्था झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परशुराम घाट सुरू होणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.