esakal | माहेरावरील प्रेमाच्या ओढीने गौराई आली; पारंपरिक गाणी गात आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

gauri aagman in maharashtra

आपल्या घरी आलेल्या माहेरवाशिणीचे रुसवे, फुगवे, लाड पुरविण्याचा सण म्हणजे गौरी-गणपतीचा सण.

माहेरावरील प्रेमाच्या ओढीने गौराई आली; पारंपरिक गाणी गात आगमन

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड - पिवळे-पिवळे ठसे, गौराई म्हणे मला माहेर दिसे...अशा ग्रामीण भाषेतील पारंपरिक गाण्यांचे सूर आळवीत सासुरवाशिणींच्या डोक्यावरून मोठ्या भक्तीभावात गौराईंचे माहेरी आगमन झाले. गौराई माहेरपणाला घरी आल्याने महिलांच्या उत्साहाला उधाण आले असून पुढील दोन रात्री झिम्मा, फुगडी अशा विविध पारंपरिक नृत्ये सादर करून गौरीचे जागरण होणार आहे. आजही तालुक्यात हा भक्तिमय सुंदर सोहळा पहावयास मिळतो. तालुक्यात आज गावोगावी ४८३ गौरींचे सर्वत्र मोठ्या उत्साहात आगमन झाले. 

 आपल्या घरी आलेल्या माहेरवाशिणीचे रुसवे, फुगवे, लाड पुरविण्याचा सण म्हणजे गौरी-गणपतीचा सण. बाप्पाचे आगमन होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटून गेलाय. सकाळी मंडणगड बाजारपेठेत गौरी पूजनासाठी लागणाऱ्या सूप, फळे, फुले वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाप्पांच्या आगमनानंतर उत्सवातील महत्त्वाचा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचे आगमन व पूजन. भाद्रपदातील ज्येष्ठा-कनिष्ठा गौर ही माहेरवाशीण म्हणून ओळखली जाते. शिवप्रिया पार्वती ही गौरीच्या रुपाने अवतरत असल्याने शिवारात समृद्धी असते. निसर्ग पानाफुलांनी बहरलेला आहे. संध्याकाळी सासुरवाशीण आणि माहेरवाशीण वेशिवरील मंदिराकडे गेल्या. गुलाबी रंगाने बहरलेला चिरडा जमा करण्यात आला. शेणाने सारवण करून त्याठिकाणी यथोचित पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिरात सोबत आणलेला गौरीचा मुखवटा गोळा केलेल्या चिरड्याच्या टोकाला बांधून साडी नेसवण्यात आली. वस्त्र, अलंकारांनी मनाजोगी सजवल्यानंतर ग्रामदेवता व गौरीची पूजा करून गौराईला घेवून घराकडे आल्या. संपूर्ण घरात फिरवल्यावर गौराईला स्थानापन्न करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी तिचा साजशृंगार करण्यात आला. यावेळी आरास, विविध प्रकारची धान्य, पत्री, फुले, अलंकारांनी नटवल्यामुळे गौराईचे सौंदर्य नखशिखांत बावन्नकशी दिसत होते. उद्या गौरी पूजनाच्या दिवशी मिष्टान्न, पुरणपोळी, खीर, पेज तर काही ठिकाणी तिखटाचे सुग्रास जेवण असते. रात्रीचा जागर घुमतो. माहेरवाशिणीचे रुसवे-फुगवे, लाडाची सरबत्ती सुरु होते. जाखडी नृत्य, झिम्मा, फुगडी, फेर धरुन नाच-दंगा, आसू आणि हसू अशी दोन रात्र जागवून गौराईचं जल्लोषानं स्वागत होतं.

हे पण वाचातब्बल चार महिन्यानंतर धावली शिवशाही

गौर रडविण्याची प्रथा

निसर्गातील हिरव्या चादरीचे रुपांतर सोनेरी रंगात बदलण्यास सुरवात झाली आहे. धन-धान्याच्या आरासाने गौराई सोन्याच्या, मोत्याच्या पावलांनी घरात प्रवेश करीत असल्याचे मानले जाते. माहेरवाशीण परत सासरी जायची वेळ आली की, विरहाचे दुःख हलके करण्यासाठी मायलेकी रात्रभर गप्पा मारतात. काटवटीवर उलटा पलिता, लाटणे, काठ्या रगडून वेगवेगळे आवाज काढत गौराईची विरहगीते म्हटली जातात. ग्रामीण भागात याला गौर रडवणे म्हणतात. पूर्वापार चालत आलेली परंपरा मंडणगड तालुक्यात गौरी पूजनाच्या दिवशी रात्री जोपासली जाते. 

हे पण वाचारत्नागिरीत ग्रामीण पेक्षा शहरात कोरोनाचा कहर सुरूच 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image