भाजपत खुशी, सेनेत गम संगमेश्‍वर तालुक्‍यातील चित्र

संदेश सप्रे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राज्यात शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले सरकार बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर भाजपमध्ये शांतता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये खुशीचे वातावरण असून सरकार बनत नसल्याने शिवसैनिकांमध्ये गम दिसत आहे.

देवरूख ( रत्नागिरी ) - राज्यातील राष्ट्रपती राजवटीनंतर निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय स्थितीत स्थानिक पातळीवर भाजपमध्ये खुशी तर शिवसेनेत गम असे वातावरण दिसत आहे. शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन झाल्यास विरोधात असूनही सत्तेत बसायला मिळण्याची शक्‍यता असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र खुशीत गाजरे खात आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, बँक हातात ठेवण्यासाठी राणेंची ही खेळी 

24 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. स्थानिक पातळीवर भाजपने याचा आनंद साजरा केला.  मात्र, चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात दारूण पराभव पत्करावा लागल्याने शिवसेनेत थंडावाच होता. सेनेच सदानंद चव्हाण यांचा शेखर निकम यांनी पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हा पराभव झाल्याने शिवसेनेतील वातावरण एकदम शांत होते. अशा स्थितीत भाजपच्या मदतीने का होईना, पण सत्ता आपलीच येणार, या खुशीत शिवसैनिक दिसत होते. पण झाले मात्र उलटेच. स्पष्ट बहुमत मिळून 14 दिवस लोटले तरी सत्ता स्थापन झाली नाहीच, शिवाय भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची हौसही पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा शिवसैनिक थंडावल्याचे पाहायला मिळाले. अशा स्थितीत भाजपने सत्तास्थापनेतून अंग काढले आणि शिवसैनिक पुन्हा जोमात दिसू लागले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने राज्यात महाशिव आघाडीचे सरकार येणार अशी स्थिती निर्माण झाली. 

अजब कारभार ! लोकसभेला मतदान, विधानसभेला नाव यादीतून गायब 

सेनेचा आनंद विरघळला 

राजकीय गोंधळात कोणतीही खातरजमा न करताच विविध वृत्तवाहिन्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आणि सर्वत्र फटाके फोडून शिवसैनिकांनी आनंद व्यक्‍त केला. मात्र, हा आनंद औट घटकेचा ठरला. काही मिनिटातच आघाडीने पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गरम झालेले वातावरण पुन्हा एकदा शांत झाले. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही अपयश आले. त्यानंतर मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. अर्थातच या सर्वांचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसून आलाच. 

नवे सरकार बनेल आणि त्यात...  

सद्यस्थितीत राज्यात शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले सरकार बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर भाजपमध्ये शांतता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये खुशीचे वातावरण असून सरकार बनत नसल्याने शिवसैनिकांमध्ये गम दिसत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले नवे सरकार बनेल आणि त्यात आपल्याही भागीदार होता येईल, या खुशीत गाजरे खाताना दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happiness In BJP unwillingness In Shiv Sena In Sangmeshwar Taluka