हापूस खायचा आहे मग दया पाच ते नऊ हजार रुपये... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hapus mango market in ratnagiri kokan marathi news

हापूसला पाच ते नऊ हजारांचा भाव दररोज पावणेदोनशे पेट्या वाशीत; शेवट टप्प्यात राहील दीडपट दर, उत्पादन कमी झाल्याने दर चांगला..

हापूस खायचा आहे मग दया पाच ते नऊ हजार रुपये...

रत्नागिरी : बदलत्या वातावरणामुळे यंदा हापूस हंगाम लांबला आहे. सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून प्रतिदिन दीडशे ते पावणेदोनशे पेट्या वाशी मार्केटमध्ये जात आहेत. मागील आठवड्यात मिळून सहाशे पेट्या गेल्या होत्या. पेटीचा दर पाच हजारांपासून नऊ हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याचे वाशीतील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. यंदा उत्पादन कमी राहिल्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत दर चांगला राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

हापूस लवकरात लवकर बाजारात आणून उत्पन्न मिळविण्याचा राजमार्ग बागायतदारांकडून अवलंबला जातो. पहिल्या टप्प्यात मिळणारे उत्पन्न हे बागायतदारांच्या जमा-खर्चाचे गणित बिघडवणारे असते. यंदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर पावसामुळे लांबला. परिणामी पहिल्या टप्प्यात येणारे उत्पादन घटले आहे. अजूनही अनेक कलमांवर मोहोरच आहे. मोजक्‍याच लोकांच्या बागांमध्ये किरकोळ प्रमाणात फळे दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात गतवर्षी अखेरच्या टप्प्यात दीड ते दोन हजार पेट्या कोकणातून वाशी मार्केटला जात होत्या. यंदा अवघ्या दीडशे ते पावणेदोनशेच पेट्या जाऊ लागल्या आहेत.

हेही वाचा- फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा... 


यंदा २० एप्रिलला आंबा अधिक

यामध्ये थोडी वाढ होईल, अशी अपेक्षा वाशीतील व्यावसायिकांकडून व्यक्‍त केली जात आहे.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्याची जाणीव आतापासूनच होत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांपुढे फळगळीचे मोठे आव्हान आहे. तर आंबा लवकर तयार होण्यास मदत होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात हापूस वाशीला रवाना होतो. यंदा २० एप्रिलला आंबा अधिक असेल. सध्या हापूसच्या बरोबरीने वाशीत बेंगनपल्ली, बदामी यासह विविध प्रकारचे आंबे दाखल होत आहेत. तरीही उत्पादन कमी असल्यामुळे हापूसचा दर गगनाला भिडलेला आहे. 

हेही वाचा-  सावधान !  धुळीने होतोय श्‍वसनाचा धोका..

यंदा हापूसला चांगला दर

यंदा उत्पादन कमी आहे, त्यामुळे हापूसला चांगला दर राहील. ज्यांच्याकडे आंबा आहे, त्यांना याचा फायदा मिळणार आहे.
- संजय पानसरे, वाशी

थ्रिप्सने बागायतदार त्रस्त​

थंडी लवकर कमी झाली असून उष्मा वाढतोय. मोहोर फुकट जात असून रोगांचे प्रमाण वाढले आहे. थ्रिप्सने बागायतदार त्रस्त आहेत. या परिस्थितीत २५ टक्‍केच उत्पादन राहील. शेवटच्या टप्प्यात दीडपट दर मिळण्याची आशा व्यावसायिकांकडून दाखवण्यात येत आहे. 
- तुकाराम घवाळी, आंबा बागायतदार

हेही वाचा-  सिंधुदुर्गात भेरली माडचे अस्तित्व धोक्‍यात...

यावर्षी दर चढे राहतील..
दरवर्षीपेक्षा यावर्षी दर चढे राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. हंगाम संपतो, तेव्हा हापूसचा दर पेटीला ७०० ते ८०० रुपयांपर्यंत येतो. यंदा तो दर दीडपट अधिक राहू शकतो, अशी शक्‍यता आहे. यंदा पेटीचा दर दीड हजार रुपयांचा राहील, असे वाशीतील व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. तसे झाले तर बागायतदारांना दिलासा मिळेल. अन्यथा, यंदाचे वर्ष तोट्याचे राहणार आहे.