esakal | शाहीन चक्रीवादळाच्या सूचनेने मच्छीमारांनी घेतला जयगड, आंजर्ले खाडीचा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

harne

शाहीन चक्रीवादळाच्या सूचनेने मच्छीमारांनी घेतला जयगड, आंजर्ले खाडीचा आधार

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णे : अरबी समुद्रात येऊ घातलेल्या शाहीन नावाच्या चक्रीवादळामुळे मासेमारीकरिता मोजकेच बाहेर पडलेल्या मच्छीमारांची आपल्या नौका जयगड आणि आंजर्ले खाडीत हलवताना एकच धावपळ उडाली. ३० सप्टेंबर २१ ला शाहीन वादळाचा धोका आणि अतिवृष्टीचा इशारा शासनाकडून मिळताच २९ सप्टेंबर २१ला सर्व मच्छीमारांनी जयगड आणि आंजर्ले खाडीचा आधार घेतला आहे.

शासनाच्या नियमानुसार १ ऑगस्ट पासून मासेमारीला सुरुवात झाली. परंतु गणपतीअगोदरच्या हंगामामध्ये फक्त हर्णे बंदरातील हजारो नौकांपैकी सहा आणि दोन सिलेंडर धरून फक्त १५० नौका मासेमारीकरिता बाहेर पडल्या होत्या. परंतु गेले महिनाभर मासळीची अवाकच झाली नाही. सर्व खर्च अंगावरच पडत होता. गणपतीपर्यंत हा उद्योग खलाशी आणि नौकामालक यांच्यात भागिदारीत असतो. परंतु मासळीचा दुष्काळच झाल्याने येथील मच्छीमार नुकसानातच होता. त्यात ता. ५ पासून ते ९ तारखेपर्यंत शासनाने वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीच नैसर्गिक संकट उभे राहिले होते. त्यामुळे तिथे शेवटचे आठ दिवस फुकटच गेले.

हेही वाचा: ना मंत्रिपदाचा बाज, ना डामडौल; गृहराज्यमंत्र्यांच्या दौऱ्याची चर्चाच

गणपती अगोदरच्या मासळी हंगामात मच्छीमारांचे चक्क नैसर्गिक आपत्तीमुळे तोंडचं फुटले. गणपती सणामध्ये अनंतचतुर्दशी पर्यंत मासेमारी बंदच होती. २५ तारखेपासून हळूहळू वातावरण बघून नौका मासेमारीला गेल्या. तेंव्हा पासून वातावरणात बदल होतच आहेत. त्यात हे ३० तारखेला धडकणारे वादळ हे अरबी समुद्रामधूनच पुढे सरकणार असल्याने मासेमारी करीता बाहेर गेलेल्या मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आणि २९ तारखेला शांत वातावरण बघून जवळपासच असलेल्या ४० ते ५० नौकांनी जयगड खाडीचा आधार घेतला तर उर्वरीत सर्व थेट आंजर्ले खाडीत आसऱ्याला घुसल्या.

गणपती सणानंतर किमान १०० ते १२० नौका मासेमारीला आंजर्ले खाडीतून बाहेर पडल्या होत्या. नुकतीच कुठे मासळी हंगामाला सुरुवात होते नाही तोवर या वादळाने आणि अतिवृष्टीमुळे मासेमारी उद्योगावर पुन्हा एकदा कुऱ्हाड बसली. यात मच्छीमारांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. कारण ऐन हंगामात मासेमारी थांबली की सर्व खर्च नौकामालकाच्या अंगावरच पडत असतो. वारंवार येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमारबांधव मेटाकुटीला आला आहे. सुरुवातीच वातावरण वादळी वाऱ्याच तसेच अजूनही बहुतांशी नौकामालकांना नौकांवर काम करण्यासाठी खलाशी देखील मिळालेले नाहीत.

त्यामुळे गेल्या हंगामात म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस शाकारलेल्या नौका अजूनही तशाच आहेत. त्यामुळे यावर्षी मासेमारीला जायचं का नाही जायचं असा यक्ष प्रश्न मच्छीमारांपुढे पडला आहे. पण आमचं हे दुःख सरकार दरबारी कोण सांगणार? , या मच्छीमार समाजाला कोणीही वाली नाही ; कोणीही नेता नाही ; अश्याप्रकारची खंत मच्छीमारबांधवांकडून व्यक्त होत आहे.

वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती मुळे मच्छीमार बांधव जेरीस आला आहे. उद्योगाकरिता पैसा कोठून उभा करायचा शासनाने करोडो रुपयांचं चलन मिळवून देणाऱ्या मस्यशेतीकडे देखील जाणीवपूर्वक लक्ष देऊन या नैसर्गिक आपत्ती मुळे होणाऱ्या नुकसानाची नुकसानभरपाई म्हणून मच्छीमारांकरिता कोकण पॅकेज द्यावे अशी आम्हा मच्छीमारबांधवांची कळकळीची विनंती पर मागणी आहे ; असे मच्छीमार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. बाळकृष्ण पावसे यांनी सांगितले.

loading image
go to top