पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून मेव्हणी, सासऱ्यावर चाकूने वार  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

रिझवान याने पत्नीला घरी पाठविण्याची मागणी मुजावर कुटुंबीयांकडे केली. यावेळी दोन्ही गटात वादावादी झाली. याचा राग धरून रिझवानने सासरा-गफूर मुजावर, मेव्हणी- नाझिया वाईकर, तसेच पत्नी आशिया यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून जखमी केले. 

रत्नागिरी - पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीसह सासरा, मेव्हणी यांच्यावर जावयाने खुनी हल्ला करत गंभीर जखमी केले. हा प्रकार काल (ता. 29) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील किर्तीनगर येथे घडला.

जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविले आहे. तक्रारीनंतर संशयित जावयाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. रिझवान इलियास हमदारे (रा. रॉयल कॉम्प्लेक्‍स, अजमेरीनगर, मुळ - भुसारवाडा-पावस) असे संशयिताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - यासीन गफूर मुजावर (वय 52, रा. किर्तीनगर- रत्नागिरी) यांची मुलगी आशिया हमदारे हिचा विवाह रिझवानशी झाला आहे. त्याच्या मानसिक जाचाला कंटाळून ती किर्तीनगर येथे आईकडे माहेरी रहायला आली होती. ती बाब संशयिताच्या मनात सलत होती. आशिया बोलावूनही सासरी येत नव्हती.

रिझवान काल (ता. 29) रात्री किर्तीनगर येथे आला. त्यावेळी रिझवान याने पत्नीला घरी पाठविण्याची मागणी मुजावर कुटुंबीयांकडे केली. यावेळी दोन्ही गटात वादावादी झाली. याचा राग धरून रिझवानने सासरा-गफूर मुजावर, मेव्हणी- नाझिया वाईकर, तसेच पत्नी आशिया यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून जखमी केले. 

गंभीर जखमी झालेल्या गफुर, नाझिया, आणि आशिया यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी सासू यासीन मुजावर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल करून जावयाला अटक केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Knife attack on Wife and Father in Law incidence in Ratnagiri