वैभव नाईक यांच्या समोर नीलेश राणे उमेदवार असते तर...

If Nilesh Rane is a Candidate in front of Vaibhav Naik Sindhudurg News
If Nilesh Rane is a Candidate in front of Vaibhav Naik Sindhudurg News

मालवण - क्‍यार चक्रीवादळात जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अद्यापही अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले नसून आपद्‌ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत आमदार वैभव नाईक आपदग्रस्त मच्छीमार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुंबईत सत्तेच्या राजकारणात गुंग झाल्याची टीका भाजपचे युवा कार्यकर्ते सनी कुडाळकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी नीलेश राणेंवर बोलताना स्वतःची उंची तपासावी, असेही श्री. कुडाळकर यांनी म्हटले आहे. अतुल बंगे यांनी पत्रकार परिषदेत नीलेश राणेंवर केलेल्या टीकेचा श्री. कुडाळकर यांनी पत्रकाद्वारे समाचार घेतला.

...तर वैभव नाईक यांचा पराभव अटळ

ते म्हणाले, ""मागील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निशाणीवर निवडणूक लढविणाऱ्या तत्कालीन मंत्री नारायण राणे यांचा वैभव नाईक यांनी 10 हजारांनी पराभव केला. पाच वर्षांपासून स्थानिक आमदार म्हणून वैभव नाईक 2019 ची तयारी करत होते. त्या उलट त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल, याचा थांगपत्ताच नव्हता. निवडणुकीच्या केवळ 10 दिवसांत याठिकाणी नारायण राणेंच्या विचारांचा उमेदवार उभा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याच्याकडे निशाणी देखील नव्हती. त्यामुळे वैभव नाईक यांचा विजय एकतर्फी होता. स्वतः शिवसेनेची नेतेमंडळी किमान 50 हजारांच्या मताधिक्‍याने वैभव नाईक विजयी होतील, असे दावे करत होते; मात्र वैभव नाईक यांचा रथ केवळ साडेचौदा हजारावर अडला गेला. त्यामुळे मतदारांनी वैभव नाईक यांना स्वीकारले की नाकारले ? याचे आत्मपरीक्षण अतुल बंगे यांनी करावे. नारायण राणेंच्या नावाने आणि कामाने प्रेरित होऊन मतदारांनी रणजित देसाई यांना 55 हजार मते देऊन वैभव नाईक यांच्यावरील राग दाखवून दिला आहे. वैभव नाईक यांच्या समोर नीलेश राणे उमेदवार असते तर वैभव नाईक यांचा पराभव अटळ होता.''

...तर राणे विजयी झाले असते

लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना स्वतःच्या ताकदीवर पावणेतीन लाख मते मिळाली. कुडाळ- मालवण मधून खासदार विनायक राऊत यांना 8 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. तर मालवण तालुक्‍यात अडीच हजार अधिक मते नीलेश राणेंनी घेतली होती. त्यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांनी युती धर्म पाळून विनायक राऊत यांना मतदान केले होते. त्यामुळे जर विधानसभेत नीलेश राणे उमेदवार असते तर लोकसभेतील शिवसेनेची 8 हजारांची आघाडी सहज मोडीत निघून राणे विजयी झाले असते; मात्र हे आकड्यांचे गणित समजणे फक्त चमचेगिरीसाठी पत्रकार परिषद घेणाऱ्या अतुल बंगे यांच्या बुद्धीपलीकडील असल्याची टीका श्री. कुडाळकर यांनी केली आहे.

म्हणून फुशारक्‍या मारू नका...

आमदार नाईक दुसऱ्यांदा आमदार झाल्याचा शिवसैनिकांना अभिमान असल्याचे वक्तव्य अतुल बंगे यांनी केले आहे. याचाही कुडाळकर यांनी समाचार घेतला. कुडाळ मालवण मतदार संघात आज अनेक समस्या कायम आहेत. आज जिल्ह्यात हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण, आणि पर्सनेट मासेमारी बाबत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेमुळे पारंपरिक मच्छीमारांची उपासमार होत आहे. मालवणात सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. रस्त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले असून खराब रस्त्यामुळे पर्यटकांनी देखील पाठ फिरवली आहे. परिणामी पर्यटन व्यावसायिक देशोधडीला लागला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारलेल्या बंगे यांनी नीलेश राणेंवर बोलू नये. राणे हे राज्याच्या राजकारणात असून तुम्ही निदान तुमच्या मतदार संघाचे नेते व्हा. चमचेगिरी करून पक्षाचे एखादे पद भेटले, म्हणून फुशारक्‍या मारू नका. राज्यातील शिवसेना नीलेश राणेंचे काही वाकडे करून शकली नाही. मग जिल्ह्यातील शिवसैनिकांना डिवचले तर ते काय दिवे लावणार? असा प्रश्‍नही श्री. कुडाळकर यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com