esakal | कोकणात कोरोना रुग्णात वाढ ;  नियम न पाळल्यास डायरेक्ट होणार गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

Increase in corona patients in ratnagiri covid 19  kokan marathi news

मुंबईसह राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याने ही दुसर्‍या लाटेची चाहूल असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.

कोकणात कोरोना रुग्णात वाढ ;  नियम न पाळल्यास डायरेक्ट होणार गुन्हा दाखल 

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  राज्यात पुन्हा कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. राज्य आरोग्य विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या चार दिवसात 67 रुग्ण सापडले. त्यातील 43 रुग्ण खेडमधील असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर वापराची सक्ती करण्यात आली आहे. मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस यांच्यावर धाडी टाकून गर्दी नियंत्रित ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत उद्यापासून कडक निर्बंध घालण्याची शक्यता आहे.

मुंबईसह राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याने ही दुसर्‍या लाटेची चाहूल असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार उपमुख्यंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना सतर्कता बाळगण्याची सूचना दिली आहे.रत्नागिरीतही गेल्या दोन दिवसात रुग्णांची संख्या वाढली आहे. खेड तालुक्यातील एका गावात एकाच दिवशी 27 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने प्रशासन हादरले. बुधवारीही (ता. 17) 23 रुग्ण सापडल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा- Good News: आता करा सोने खरेदी; तोळ्याला आहे एवढा दर

 या पार्श्‍वभूमीवर लोकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर सक्तीचे करण्यात आले आहे. लग्न सराईसह, अन्य मोठे समारंभ सुरू असून लोकांची गर्दी वाढताना दिसत आहे. म्हणून मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेस यांच्यावर धाडी टाकून मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देत मास्क न लावणार्‍यांवर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. पुन्हा-पुन्हा या चुका होत असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आहेत.

आपल्याकडे अजूनही कोविडबाबत काही नियम लागू आहेत. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग सक्तीची करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. याबाबत उद्या जिल्हाधिकारी बैठक घेऊन कोविड बाबतची आचारसंहिता ठरविण्यात येणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली.

हेही वाचा- कोकणात राडा : दोन कुटुंबांत हाणामारी; सात जण जखमी

कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केला आहे. गर्दी टाळण्यात यावी, या अनुषंगाने नियोजन केले जाणार आहे.

- बाबू म्हाप,बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद

संपादन- अर्चना बनगे