कोकणचा राजा घेऊन लालपरी पोहचली विविध भागात...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

रायपाटणसारख्या गावातून भागातून औंरगाबाद येथे सुमारे 3.5 टन आंबा घेवून लालपरी धावली आहे.

राजापूर  (रत्नागिरी) :  लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्याप्रमाणात मागणी असूनही कोकणातील हापूस आंबा अनेकांपर्यंत विविध कारणांमुळे पोहचू शकलेला नाही. अशा स्थितीमध्ये लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीच्या तोट्यामध्ये चाक रूतलेल्या ’लालपरी‘ने (एस.टी.) कोकणातील आंबा विविध भागांमध्ये पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

रायपाटणसारख्या गावातून भागातून औंरगाबाद येथे सुमारे 3.5 टन आंबा घेवून लालपरी धावली आहे. यापूर्वी विविध भागातून एस.टी. आंब्याच्या पेट्यांची वाहतूक केली. एवढ्या मोठ्यासंख्येने ‘कोकणचा राजा’ ‘लालपरी’मध्ये  बसण्याची लॉकडाऊनच्या काळातील बहुदा पहिलीच घटना असावी.

हेही वाचा - महापालिकेने कोरोनाला रोखले...आता मात्र याचा धोका -

गावोगावी धावणारी एस.टी. सर्वसामान्यांचे वाहन म्हणून ओळखले जाते. ज्या वाडीवस्तीममध्ये खाजगी गाड्या धावत नाहीत त्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून एस.टी. धावत आहे. त्यातून, दिवसरात्र, उन-पाऊस यामध्ये धावणार्‍या या गाडीला सर्वसामान्यांची ‘लालपरी’ म्हणून ओळखले जावू लागले आहे. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनचा फटका एस.टी सेवेलाही बसला. गावोगावी धावणार्‍या या लालपरीची चाके गेल्या काही दिवसांपासून रूतून बसलेली आहेत.

त्यातून, एस.टी.महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये शिथिलता आणल्याने काही मार्गांवरील लालपरी आता धावू लागली आहे. आंब्या पेट्या वाहतूकीसाठी सद्यस्थितीमध्ये न परवडण्यासारखे भाडे आकारले जात असताना कमी दरामध्ये सुरक्षितपणे एस.टी. आंबा पेट्या मार्केटमध्ये पोहचवत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लोकांच्या सेवेसाठी धावणारी एस.टी. आता कोकणातील प्रसिद्ध हापूस राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहचविण्यासाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा - रानमेवा पिकला ; आस्वादक स्वाद जिभेवर लागला रेंगाळू ...

लॉकडाऊनमध्ये शासनाने जारी केलेल्या अटी आणि शर्थींची पूर्तता करून आंबा मार्केटमेध्ये पाठविताना छोट्या व्यापार्‍यांच्या नाकी दम येत होता. अशातच या व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांच्या सेवेला सर्वसामान्यांची लालपरी आता धावून आल्याने सार्‍यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील राटपाटण येथील कोकणबाग शेतकरी समूहाच्या सुमारे साडेतीन टन आंबा घेवून एस.टी. औंरगाबाद येथे काल रवाना झाल्याची माहिती कोकणबाग समूहाचे संचालक महेश पळसुले देसाई यांनी दिली. यासाठी जिल्हा वाहतूक अधिकारी श्री. जगताप, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोरे यांनी या कामी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना सहकार्य केले. औरंगाबाद येथे आंबा पाठविण्यासाठी कोकणबाग’चे संचालक महेश पळसुलेदेसाई, व्यंकटेश कल्याणकर, व्यवस्थापक दीपक पवार, मंदार गांगण आदींसह सहकार्‍यांनी मेहनत घेतली.

बेळगावात सापडले आणखी 13 कोरोना पॉझिटिव्ह....

 

निवृत्तीपूर्वी ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार
 
औरंगाबादला निघालेल्या मालवाहतूक बसचे वाहक श्री. पवार  येत्या 31 मेला सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, बसन मालवाहतूक करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी या बसमध्ये ड्युटी देण्याची विनंती केली. महामंडळानेही त्यांना ड्युटी देऊन या कामी सहभागी होण्याची संधी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: initiatives to deliver mangoes from konkan st division