मंडणगड शहरासह गावागावांत घरांच्या ओटीवर टाळ्या आणि थाळीनाद....

janta curfew Applause and chants in all people Mandangad kokan marathi news
janta curfew Applause and chants in all people Mandangad kokan marathi news

मंडणगड (रत्नागिरी) : जागतिक रोग ठरलेल्या भयानक अशा करोनाला थोपवून धरणाऱ्या आपल्या देशबांधवांबद्दल आदर व्यक्त करताना टाळ्या, थाळीनाद करून त्यांच्याप्रती असणारी कृतज्ञता ठीक पाच वाजता सर्वांनी व्यक्त केली. देशप्रेमाचे हे बंध त्यामुळे आणखीनच घट्ट झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. मंडणगड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गावागावातून नागरिकांनी घरांच्या ओटीवर, अंगणात येवून आपल्या भावना व्यक्त करताना टाळ्यां, थाळ्या, घंटा, शंखनाद करून या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी झालेल्या देशवासीयांचे आभार मानले.

सर्वच स्तरातील नागरिकांचा सहभाग

 जनता कर्फ्युला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेहमी नागरिकांच्या वावरण्याने, मुलांच्या हसण्या-खेळण्याने, गाईगुरांच्या हंबरठ्याने, पशुपक्षांच्या आवाजाने गबजणारी गावांतील सकाळ शांततामय उगवली. मुलांनी बागडणारी अंगणे ओस पडली. गावातील पायवाटा, रस्ते सुनसान झाले. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा निश्चय केल्याने गावांत एकदम शांतता पसरली. कोरोना वायरस झपाट्याने पसरत असल्याने त्याला रोखण्यासाठी ता.२२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत जनता कर्फ्युचे आवाहन केले. त्याला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला. यात ग्रामीण भागही सहभागी झाल्याचे दिसून आले.

देशबांधवांबद्दल आदर व्यक्त​

मंडणगड तालुक्यात ता.२१ मार्चच्या संध्याकाळपासूनच प्रतिसादाला सुरवात झाली. मुख्य बाजारपेठा बंद करण्यात आल्या. एसटी प्रशासनाने अनेक फेऱ्या रद्द केल्या. ता.२२ मार्च रोजी सकाळपासूनच आपली जबाबदारी पार पाडतात नागरिक दिसून आले. गावोगावी रात्री बंद झालेल्या घरांची दारे सकाळ होऊन गेली तरी उघडली नाहीत. सकाळी सार्वजनिक नळांना पाणीच न आल्याने होणारी गर्दी गायब झाली. तसेच गावात प्रसार माध्यांमातून जनजागृती झाल्याने ग्रामस्थांनी कर्तव्यदक्षता दाखवली.

कोरोनाला थोपवून धरणाऱ्यांना अभिवादन

सार्वजनिक ठिकाणे ओस पडली. रस्त्यावरील वाहने गायब झाली. गावांतील नागरिकांनी घरातीलच कामे पूर्ण करण्यासाठी वेळ दिला. टीव्ही, मोबाईलच्या माध्यमातून चाललेल्या घडामोडींचा मागोवा घेणे पसंत केले. दिवसभर घरातच राहिल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता गावांतील ग्रामस्थ, महिला, शेतकरी, मुलांनी घराच्या ओटीवर, अंगणात येत टाळ्यांचा कडकडाट केला. थाळ्यांच्या आवाजाने गावांतील वातावरण निनादले. लहान मुलांनी खेळण्यातील ढोलताशे वाजविले. देशातील पोलिस, आरोग्य विभाग, शासन, प्रशासन व कोरोना विरुद्ध लढाई लढणाऱ्या देशबांधवांचे आभार मानीत त्यांना अभिवादन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com