नगरसेवकांनो... तुम्हीसुद्धा..? : संचारबंदीमध्ये महाआघाडीच नाटक..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

संचारबंदीला महाविकास आघाडीकडून केराची टोपली.. शहरात स्वच्छता; सफाई कामगार, नगरसेवक व पदाधिकारी एकत्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग.. 

चिपळूण (ऱत्नागिरी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरी भागात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले; मात्र चिपळुणातील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. शहर स्वच्छतेच्या नावाखाली महाविकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी, सफाई कामगार एकत्र जमले होते. 

सामान्य नागरिक दुचाकी घेऊन बाहेर पडले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला, इथपर्यंत ठीक होते. आता तर चक्क नगरसेवकांनीच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यामुळे नगरसेवकांनो... तुम्हीसुद्धा? असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा- गाडी मागे लाव अस तो म्हणताच त्याने घुसवला सुरा पोटात....

नगरसेवकांनो... तुम्हीसुद्धा?

चिपळूण शहरात सोमवारी बाजारपेठ बंद होती. अनेक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी चिंचनाका येथे कारवाई केली. तिथेच शहर विकास आघाडीचे नगरसेवक आणि पदाधिकारी एकत्र जमले. सफाई कामगारांना बोलावून पाण्याचा टॅंकर मागवण्यात आला. सफाई कामगारांच्या हस्ते रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. रस्ता धुवत असताना शहर विकास आघाडीचे नगरसेवक तोंडाला मास्क लावून सफाई कामगारांचे काम बघत उभे होते.

हेही वाचा- रानात राहून मेंढपाळ दादा घेऊ लागला आता अशी काळजी....

जिल्हाधिकाऱ्यांच्या केला आदेशाचा भंग

पालिकेच्या विविध खात्यांचे सभापतिपद भूषविणारे नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी याचे छायाचित्र घेऊन तातडीने सोशल मीडियावर फिरवले. त्यानंतर लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी होऊ नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे; मात्र पालिकेतील सफाई कामगार आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला. या नगरसेवकांवर प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 हेही वाचा-Photo : ओपीडी बंद केल्याने रुग्णांची झाली घालमेल...
महाआघाडीच नाटक
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्याची सूचना मी प्रशासन विभागाला केली आहे. शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले आहे. शहरात आवश्‍यक त्या खबरदारीच्या उपाययोजना मी केल्या आहेत. प्रशासन विभागही सूचनांचे पालन करीत आहे. शहरात दुसऱ्यांदा औषध फवारणी सुरू आहे. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असल्यामुळे सर्वजण खबरदारी घेत आहेत; पण महाविकास आघाडीने सांस्कृतिक केंद्र बंद ठेवून रस्त्यावर अशा प्रकारचे त्यांनी नाटक केले आहे. 
--सुरेखा खेराडे, नगराध्यक्ष, चिपळूण.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janta curfew Breach of order city president in chiplun kokan marathi news