काजिर्डा घाटरस्तासाठी गावकऱ्याचे श्रमदान ; मनसेचीही साथ

Kajirda Ghat road prepared by villagers Manase also Supports in work
Kajirda Ghat road prepared by villagers Manase also Supports in work

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा अशा तीनही जिल्ह्यांना एकत्र जोडणारा राजापूर तालुक्‍यातील काजिर्डा घाट रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित राहिला आहे. घाटमाथ्यावर जाण्यासाठी अन्य मार्गांना पर्यायी मार्ग असलेला काजिर्डा घाटातील हा रस्ता व्हावा म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून येथील ग्रामस्थांसह समाजधुरिणांकडून प्रयत्न केले गेले. मात्र, शासन दरबारी त्यांची मागणी दुर्लक्षित राहिली. समाजातील दात्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने श्रमदानातून घाटरस्ता करण्याचे धाडस दाखवून काजिर्डा ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने शासनासह लोकप्रतिनिधींच्या डोळ्यामध्ये कृतीद्वारे अंजन घातले आहे. 

सुमारे तेराशे लोकवस्ती असलेले काजिर्डा गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे. कोकणातील लोकजीवन ठासून भरलेला हे गाव शेकडो फुटावरून अविरतपणे बारमाही वाहणाऱ्या धबधब्यामुळे पर्यटन नकाशावर आला आहे. हजारो एकर जमीन ओलिताखाली आणणारा काजिर्डा धरण प्रकल्पही या ठिकाणी उभारला जात आहे. विविध कारणांनी या प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट स्थितीमध्ये रखडले आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला काजिर्डा गावचा राजापूर तालुक्‍यामध्ये समावेश असला तरी, घाटमाथा परिसर तालुक्‍यातील अन्य गावांच्या तुलनेमध्ये अधिक जवळ आहे. 

घाटमाथा परिसर आणि कोकण यांना अणुस्कुरा घाटातून गेलेल्या रस्त्याने जोडले गेले असून या घाटातून ये-जा करणे वाहनचालकांकडून अधिक पसंत केले जाते. मात्र, त्याचवेळी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूर अशा तीनही जिल्ह्यांना जोडणारा काजिर्डा घाटातून जाणारा मार्गही आहे. अणुस्कुरा घाटमार्ग होण्यापूर्वी काजिर्डा घाटातून रस्ता करण्याला प्राधान्य दिले गेले होते. त्या दृष्टीने सर्व्हेक्षणही झाले होते; मात्र काही कारणास्तव काजिर्डा घाटरस्ता मागे पडून अणुस्कुरा घाटरस्ता झाला. त्यानंतर, काहीसा दुर्लक्षित राहिलेल्या काजिर्डा घाटरस्त्याचे अद्यापही भाग्य उजळलेले नाही. 

वेळेसह पैशाची बचत 
दळणवळणासह वाहतुकीसाठी सुरक्षित आणि वेळेसह पैशाची बचत करणारा काजिर्डा घाटरस्ता व्हावा, अशी गेल्या कित्येक वर्षापासून काजिर्डा ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र, ना शासनाने घेतली दखल ना लोकप्रतिनिधींनी. साऱ्यांकडून दुर्लक्षित राहिल्याने अखेर काजिर्डावासीयांनी स्वतः हातामध्ये टिकाव...फावडा अन्‌ घमेल घेऊन घाटरस्ता करण्याला सुरवात केली आहे. श्रमदानातून घाटरस्ता करण्यासाठी काजिर्डावासीयांच्या प्रयत्नांना मनसेने मदतीचा हात दिला आहे. सुमारे पाच वर्षापूर्वीही काजिर्डावासीयांनी श्रमदानातून घाटरस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नातून काजिर्डा घाटरस्ता वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे. 

35 किलोमीटर अंतर कमी 
काजिर्डा घाटातून जाणारा घाटरस्ता राजापूर-पाचल-मूर-काजिर्डा-पडसाळी-भोगाव करीत पुढे कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जातो. अणुस्कुरा घाटातून जाणाऱ्या रस्त्याच्या तुलनेमध्ये काजिर्डा घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे सुमारे 35 किलोमीटर अंतर कमी होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितले जाते. त्यातून वेळेसह खर्चाचीही बचत करणारा हा रस्ता राजापूर ते काजिर्ड्यापर्यंत झालेला आहे. पुढे पडसाळी ते भोगाव - कोल्हापूर असा झालेला आहे. मात्र, त्यामध्ये असलेला घाटातील काजिर्डा ते पडसाळी हा सुमारे साडेतीन किलोमीटरचा रस्ता अद्यापही झालेला नाही. येथील पायवाटेचा ग्रामस्थांकडून उपयोग केला जातो. 

"शॉर्टकट'ला प्राधान्य 
ज्या काळामध्ये सध्यासारखे घाटरस्ते अन्‌ मुबलक प्रमाणात वाहने नव्हती त्या वेळी काजिर्डा घाट रस्त्याचे अनन्यसाधारण महत्व होते. घाटमाथ्यावरील अनेक व्यापारी आजच्यासारखे शेतमालासह अन्य विविध प्रकारच्या मालाची विक्री करण्यासाठी येत असतं. त्या काळामध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या मालाची वाहतूक बैलांवरून ओझी वाहून केली जात होती. मालवाहतूक करणारे हे बैल शॉर्टकट मार्ग म्हणून काजिर्डा घाटातून कोकणामध्ये म्हणजे घाटाच्या पायथ्याशी येत असत. कालपरत्वे मालवाहतूक करणारे बैल या मार्गातून येणे बंद झाले असले तरी, काजिर्डावासीयांकडून घाटमाथ्यावर जाण्यासाठी घाटातील या "शॉर्टकट'ला प्राधान्य दिले जाते. 

काजिर्डा घाटरस्ता व्हावा, अशी गेल्या कित्येक वर्षापासून आमची मागणी नेहमीच दुर्लक्षित राहिली. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष (कै.) भिकाजीराव चव्हाण यांच्यानंतर माजी बांधकाम सभापती अण्णा वायकूळ यांनी काजिर्डा ग्रामस्थांच्या रस्त्याच्या मागणीची दखल घेतली होती. त्या काळामध्ये रोजगार हमी योजनेतून तात्पुरती डागडुजी झाली. त्यानंतर, काजिर्डा ग्रामस्थ एकजुटीने श्रमदानातून रस्ता करीत आहेत. त्याला समाजातील दात्यांसह राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेची साथ मिळाली आहे. या साऱ्या प्रयत्नांनंतर शासनाकडून लक्ष दिले जाईल ही अपेक्षा आहे. 
- अशोक आर्डे, सरपंच काजिर्डा 

वारंवार मागणीनंतरही शासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या काजिर्डा घाटरस्ता करण्याचा निर्धार काजिर्डा ग्रामस्थांनी केला आणि तत्काळ कृतीमध्येही उतरविला. ग्रामस्थांच्या योगदानाची शासनाने सकारात्मक नजरेतून दखल घ्यावी. 
- संतोष काजारे, सामाजिक कार्यकर्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com