esakal | विकास संस्थांच्या निवडणुकाही रंगणार । Election
sakal

बोलून बातमी शोधा

विकास संस्थांच्या निवडणुकाही रंगणार

विकास संस्थांच्या निवडणुकाही रंगणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : तालुक्यातील ७ विकास सेवा संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. त्यामुळे सहकारातील राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकी सोबतच या विकाससेवा संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. यासाठी सहकार विभागाने मतदार याद्याची प्रक्रीया सुरू केली आहे. सहकार क्षेत्रात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप, असा सामना रंगतदार होणार आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून सहकार क्षेत्रातल्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता या निवडणुका घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार असून या बँकेची ही मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या बँकेमध्ये सभासद संस्था असलेल्या गाव विकास सेवा संस्थानाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विकास संस्थांच्या निवडणुकाही येत्या काळात होऊ घातल्या आहेत.

हेही वाचा: कोळशाच्या किमती वाढल्याने लघू उद्योगांना लागणार टाळे?

सहकार विभागाने ‘ब’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकाची प्रक्रिया जाहीर केली आहे. या अनुषंगाने तालुक्यातील सातही विकाससेवा संस्थांच्या निवडणुकांची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मतदार यादी तयार करून त्याची अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे. या अनुषंगाने तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. तालुक्यातील ३८ विविध कार्यकारी सेवा संस्था आहेत. यातील बहुतांशी विकाससेवा संस्थानचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कार्यकारी सेवा संस्थांच्या या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

कलमठ विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आता सातही सेवा संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्याने कणकवलीत पुन्हा एकदा सहकाराचे राजकारण तापणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला थेटपणे कर्ज पुरवठा करणाऱ्या या संस्थांना काही वर्षांत महत्व प्राप्त झाले आहे. शेतकरीही विविध बियाणे आणि खते खरेदीसाठी शेती कर्ज घेत आहे. गेल्या सरकारच्या कालावधीत शेती कर्ज माफ झाल्याने आता शेतकऱ्यांचा कर्ज घेण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यामुळे शेती संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातही संस्थांच्या निवडणुका या संघर्षाच्या होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: वन डे ट्रीप : ऐतिहासिक कनकेश्वर

सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये असे प्रत्येकाला वाटते; मात्र यात गेल्या काही वर्षात राजकीय पक्षांचा थेटपणे हस्तक्षेप सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षांचे पॅनल तयार करून या निवडणूकीत उतरण्याची तयारीत आहेत. सध्या बहुतांशी गावात पक्षविरहीत संस्थाच्या निवडणूका घेतल्या जात असत; मात्र आता जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राजकीय कलाटणी मिळाल्यानंतर सहकाराच्या गावापातळीवरील राजकारणात रंग भरू लागले आहेत. संस्थाच्या प्रतिनिधींना बँकेच्या मतदानाचा हक्क आणि उमदेवारी लढवण्याची संधी असल्याने यात बडे नेते गावपातळीवरील संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आतापासून रणनिती तयार करताना दिसत आहेत.

तालुक्यातील सात मोठ्या संस्था

डामरे विकास सेवा सोसायटी, तळेरे विकास सेवा सोसायटी, ओसरगाव विकास सेवा सोसायटी, वरवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी, कणकवली विविध कार्यकारी सेवा सोसायटी, खारेपाटण कार्यकारी सेवा सोसायटी आणि असलदे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका होणार आहेत. कणकवली तालुक्यातील या सात मोठ्या संस्था आहेत.

loading image
go to top