esakal | वन डे ट्रीप : ऐतिहासिक कनकेश्वर । Trip
sakal

बोलून बातमी शोधा

वन डे ट्रीप : ऐतिहासिक कनकेश्वर

वन डे ट्रीप : ऐतिहासिक कनकेश्वर

sakal_logo
By
प्रशांत ननावरे

खांदेरी-उंदेरी किल्ले, विशाल पसरलेला अरबी समुद्र आणि दूरवरून मुंबईचे दर्शन घ्यायचे असेल तर कनकेश्वरला भेट द्यायलाच हवी. श्री कनकेश्वर देवस्थान हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अलिबागचं धार्मिक महत्त्व अधोरेखित करणारं ठिकाण आहे.

मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या टप्प्यातील आणि अलिबाग शहरापासून १२ किलोमीटर अंतरावरील हे ठिकाण केवळ एक धार्मिक स्थळ नसून इतिहास, संस्कृती, निसर्ग, स्थापत्य आणि साहस यांचा सुंदर मिलाफ आहे. पायऱ्यांनी वर गेल्यास साधारण तास-दीड तासात वर पोहोचता येते. राजमार्गावरून म्हणजेच पायऱ्यांवरून चालत जायचं नसेल आणि ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर मापगाव किंवा झिराड गावातून ट्रेकही करता येतो.

हेही वाचा: शाळेत जाताना ‘सावधान’!

चढताना रिमझिम बरसणारा पाऊस असेल तर चढाई अधिकच सुखकर होऊन जाते. देवस्थानच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम मजबूत दगडात करण्यात आलेले आहे. कमी उंचीच्या, रुंद पायऱ्यांमुळे चढताना फारसा दम लागत नाही. चालताना मध्येच दूरवर मोठ्या वृक्षांच्या साथीने वाढलेली छोटी झाडे आणि वेलींचे छत तयार झालेले दिसते, त्याखालून जाताना काही क्षण थकवा दूर होऊन जातो आणि पुढील चढाईसाठी आपण पुन्हा एकदा सज्ज होतो. तुफान पावसाळ्यात सकाळी लवकर इथे गेलात तर पायऱ्यांची वाट धुक्यामध्ये हरवलेली असते. आकाशातील दरबारात प्रवेश करत असल्याचा भास त्या वेळी होतो.

समुद्रसपाटीपासून वर जायला लागल्यावर वारा आपली उपस्थिती जाणवून द्यायला लागतो. आकाश जवळ यायला लागतं आणि थोडा मोकळा परिसर आल्यावर मागे वळून पाहताना अलिबागचं दर्शन होतं. डावीकडे संपूर्ण अलिबाग आणि मांडवी, मुरुडकडे जाणारा भाग दिसू लागतो. मधेच देवाची पायरी लागते. देवाने या ठिकाणी पाय ठेवला होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. वाटेत नंदीचे स्थानही आहे.

हेही वाचा: मुलीच्या आईस्क्रीमसाठी त्याने लोअर परेल ब्रिजवर अचानक गाडी वळवली आणि...

तिथे काही काळ विसावा घेता येऊ शकतो. मंदिराच्या अलीकडे असलेल्या गायमांडी या विश्रांतीस्थापासून पुढे कठीण चढ संपतो. याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे. पुढे श्री पार्लेश्वर मंदिर लागते. वर पोहोचता पोहोचता मंदिराच्या अलीकडे उजवीकडे ब्रह्मकुंड लागते. लाल दगडामध्ये बांधलेल्या या कुंडामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. कुंडातील नितळ पाणी, आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांचे त्यामध्ये पडलेले प्रतिबिंब, सावली आणि वर निरभ्र आकाश यामुळे कुंडाच्या आत शिरल्यावर एका स्वप्नाच्या दुनियेत आल्यासारखं वाटतं. इथे मनसोक्त डुंबता येतं. शेकडो पायऱ्या चढून आल्यानंतर आलेला थकवा काही क्षणांत दूर होतो.

पाण्यात थोडी धमाल केल्यानंतर पुढे जाताना कनकेश्वर मंदिराचा कळस आणि आजूबाजूचा परिसर दिसायला लागतो. श्री कनकेश्वर देवस्थान ट्रस्ट लिहिलेली पिवळ्या रंगाची कमान तुमचं स्वागत करते. मंदिर परिसरात पाऊल ठेवल्यावर मुख्य मंदिराखेरीज अनेक छोटी देवळं आणि पाण्याची कुंडं विखुरलेली दिसतात. मंदिराच्या आजूबाजूला लाल दगडामध्ये बांधलेली अनेक छोटी घरं आहेत. या घरांचा धर्मशाळा म्हणून वापर केला जातो. मंदिर परिसरात एकूण दोन पुष्कर्णी आहेत. मंदिराच्या समोरच मोठी पुष्कर्णी आहे. गोल आकारात बांधलेली उतरत्या पायऱ्यांची पुष्कर्णी स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याच पुष्कर्णीच्या दगडातून मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या पुष्कर्णीला वर्षभर गोड पाणी असतं. पाण्यात जायला कुणालाही परवानगी नाही आणि हे पाणी केवळ मंदिरासाठी वापरलं जातं. मंदिराचं बांधकाम आणि त्यावरील मूर्तीकाम अतिशय सुंदर आहे.

समुद्रसपाटीपासून मंदिरापर्यंत जितके अंतर आहे, जवळपास तितक्याच अंतराचा परिसर टेकडीवर पसरलेला आहे. मंदिरापासून थोडं पूर्वेकडे वर गेल्यावर आणखी एक पुष्कर्णी पाहायला मिळते, पण तिचे तलावात रूपांतर केले गेले असून, खाली गावाला त्यातून पाणीपुरवठा केला जातो. डोंगरावरील घनदाट जंगलातून व्याघ्रेश्वरच्या टेकडीवर जाता येते; मात्र जंगली श्वापदांचा धोका असल्यामुळे माहीतगार व्यक्तीच्या सोबतीनेच येथे जा. या जंगलामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मिळतात. हा संपूर्ण परिसर वनखात्याच्या अखत्यारीत येतो. व्याघ्रेश्वर टेकडी ही सर्वांत उंचावर म्हणजेच समुद्रसपाटीपासून ३७५ मीटर उंचीवर आहे. टेकडीवर पूर्वीचा रेल्वे टॉवर आणि जुने मंदिर आहे. टॉवरच्या एका बाजूला व्याघ्रेश्वर मंदिर आणि दुसऱ्या बाजूच्या टोकावरून धरमतरची खाडी आणि जलदुर्गांचे दर्शन होते. खाली पसरलेला हिरवागार गालिचा, त्यातून डोकं वर काढणाऱ्या मानवी वस्त्या, जलाशय आणि डोक्यावरील निळ्या आकाशाचे दूरवर समुद्रात पाण्याशी झालेलं मिलन या टेकडीवरून अनुभवता येतं.

nanawareprashant@gmail.com

loading image
go to top