कणकवलीत जानेवारीत पर्यटन महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन महोत्सवात अभिनेते भाऊ कदम, कुशल बद्रिके यांचा  धम्माल विनोदी कार्यक्रम असणार आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्सव २ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेते भाऊ कदम, कुशल बद्रिके यांचा समावेश असलेला धम्माल विनोदी कार्यक्रम असणार आहे.  याखेरीज विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणारा फूड फेस्टिव्हल देखील होणार आहे.

शहरवासीयांसाठी भव्य चित्ररथ स्पर्धा, होममिनिस्टर स्पर्धा तसेच कणकवलीतील कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडेयांनी दिली.येथील नगराध्यक्ष दालनात श्री.नलावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पर्यटन महोत्सवाची माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक किशोर राणे आदी उपस्थित होते.

महोत्सवाचा प्रारंभ २ जानेवारीला

श्री. नलावडे म्हणाले, ‘कणकवलीवासीयांचा हा महोत्सव म्हणजे आनंद, खाद्यजत्रा, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम याचा मिलाफ आहे. महोत्सवाचा प्रारंभ २ जानेवारीला फुड फेस्टीव्हलने होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजता पटकीदेवीमंदिर ते पटवर्धन चौक आणि तेथून पर्यटन महोत्सव स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा निघणार आहे. यात शहराच्या सर्व प्रभागातून चित्ररथ सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - कोकणात विकासकामांना स्थगिती नाही ,पण...

अभिनेत्यांचा धम्माल विनोदी कार्यक्रम

शोभायात्रेचा पर्यटन महोत्सव स्थळी समारोप झाल्यानंतर फुड फेस्टिव्हलचे उद्‌घाटन आणि त्यांनतर अभिनेते भाऊ कदम, कुशल बद्रिके यांच्या सहभागाचा धम्माल विनोदी कार्यक्रम होणार आहे.’’३ जानेवारीला आम्ही कणकवलीकर प्रस्तुत दीडशे कलावंतांचा सहभाग असलेला धम्माल विनोदी कार्यक्रम आणि ऑकेस्ट्रा होणार आहे.

नामवंत सिनेकलाकार भेटीला

तीन तासाचा हा कार्यक्रम रात्री आठ वाजता हा सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुहास वरुणकर आणि प्रा. हरी भिसे यांची असणार आहे. ४ आणि ५ जानेवारी रोजी नामवंत सिनेकलाकार, गायक यांचा समावेश असलेली संगीत रजनी व इतर कार्यक्रम होणार आहेत.

हेही वाचा - हत्तींना रोखणार 'ही' बटाटा बंदूक

पर्यटन महोत्सवात होममिनिस्टर

पुढील आठवड्यात या कार्यक्रमांची निश्‍चिती होईल असे श्री.नलावडे म्हणाले. पर्यटन महोत्सवात होममिनिस्टर, जादूचे प्रयोग व इतर स्पर्धा देखील होणार असून त्याचे नियोजन सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून सुरू आहे. खासदार नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या सहकार्यातून हा महोत्सव होत असल्याचेही ते म्हणाले.

महोत्सवासाठी नगरपंचायतीचा निधी नाही

कणकवली पर्यटन महोत्सवासाठी नगरपंचायतीने १० लाखांची तरतूद केली आहे. पण कणकवलीकरांच्या करातून जमा झालेला निधी आम्ही पर्यटन महोत्सवासाठी वापरणार नाही. तसेच शहरातील व्यापारी, विक्रेते यांच्याकडूनही पर्यटन महोत्सवासाठी निधी गोळा केला जाणार नाही, अशी माहिती नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी दिली.

 हेही वाचा - डाॅ. आंबेडकर यांचे मुळ आडनाव माहीत आहे का ? जाणून घेण्यासाठी वाचा

८ ला कलावंतांची निवड

आम्ही कणकवलीकरांतर्फे ३ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. संगीत, नृत्य, अभिनय, गायन, वादन आदींचा मिलाफ असणाऱ्या या कार्यक्रमासाठी १५० कणकवलीतील कलावंत निवडले जाणार आहे. या कलावंतांची निवड ८ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता नगरवाचनालय सभागृहात होईल अशी माहिती श्री. नलावडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kankavali Tourism Festival