नेपाळ हद्दीवर जात असताना एका अवघड वळणावर चालकाचे सुटले नियंत्रण अन्....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

मनुष्यहानी नाही - अपघातानंतर चालक फरार..मजुरांना नेपाळ येथे घेऊन निघालेली खासगी आरामबसला भोस्ते घाटात अपघात...

खेड (रत्नागिरी)  : रत्नागिरी येथून मजुरांना घेऊन नेपाळ हद्दीवर निघालेल्या खासगी आरामबसला खेड नजीकच्या भोस्ते घाटात अपघात झाला. एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी कोरोनाच्या भितीने गावाकडे निघालेल्या मजुरांची बस अपघातग्रस्त झाल्याने मजुरांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणाऱ्या नेपाळी मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी एक खासगी बस भाड्याने ठरवली होती. प्रत्येक मजुराकडून सात हजार रुपये भाडे घेऊन जोर्तिलिंग टँव्हल्स कंपनीची खासगी बस या मजुरांना नेपाळच्या हद्दीवर नेऊन सोडणार होती. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथून सुटलेल्या या बसमध्ये ४० प्रवासी आणि काही लहान मुले होती. आपल्या कुटुंबासह गावाकडे जाण्यासाठी निघालेली ही रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास  खेड  तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाट उतरत होती. ही बस एका अवघड वळणार आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या दुभाजकावर  आदळून पलटी झाली. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून हे प्रवाशी या जीवघेण्या अपघातातून बचावले.

हेही वाचा- कोल्हापूरात ग्रामपंचायत सदस्याने केला महिला सरपंचचा विनयभंग ; ती काढत होती मार्ग अन्... -

अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रवाशी वाहतुकीला जे नियम घालून दिले आहेत. त्या नुसार बसमधून केवळ २२ प्रवाशांच्या वाहतुकीला परवानगी आहे. त्यामुळे या बसमधून ४० प्रवाशी आणि काही लहान मुलांना प्रवास करण्याची परवानगी कशी दिली गेली हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. भोस्ते घाटात खासगी आराम बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच, खेड येथील काही नागरिक याठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा- संख्या काय थांबेना : रत्नागिरीत आणखी 18 रुग्ण पॉझिटिव्ह... -

दरम्यान खेड शहरातील अन्य सामाजिक कार्यकर्ते बुरहाण टांके आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी अपघातग्रस्त झालेल्या या बस मधील प्रवाशांची विचारपुस करून त्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली. ज्या वळणावर हा अपघात झाला त्याच वळणावर गेल्या एका महिन्यात सहा अपघात झाले आहेत. महामार्ग चौपदरीकरणा दरम्यान तयार करण्यात आलेले हे वळण अतिशय धोकादायक असल्याने त्याच ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे सावर्जनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khed accident case in ratnagiri