Kokan : जलदेवता प्रसन्न असलेले जुवे बेट पर्यटन नकाशावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan news

Kokan : जलदेवता प्रसन्न असलेले जुवे बेट पर्यटन नकाशावर

गाव सीमेचे भौगोलिक संदर्भ बदलत चारी बाजूंनी निळाशार पाण्याने वेढलेले गाव म्हणजे जुवे. पारंपरिक छबिना (होडी) वगळता दळणवळणाची कोणतीही साधने नसलेल्या जुवे गावाने बेट म्हणून आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. पर्यटनदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या जुवे बेटाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. याच पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता निसर्ग पर्यटनाच्या विकासासोबत स्थानिक लोकांच्या संस्कृतीचे जतन व रोजगाराला चालना देणे, कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे यादृष्टीने वन विभागामार्फत जुवे येथे कांदळवन उद्यान निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा: Kokan : शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार भास्कर जाधव यांची भेट

त्या अनुषंगाने गत महिन्यामध्ये कांदळवन आणि वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जुवे बेटाला भेट देवून पाहणीही केली. कांदळवन उद्यान निर्मितीच्या प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असून त्याला वनविभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूरीला शासनस्तरावरून सकारात्मक असलेला प्रतिसाद पाहता या कांदळवन उद्यान निर्मितीच्या माध्यमातून जलदेवतेने जणू कवेत घेतलेले जुवे बेट पर्यटनदृष्ट्या भविष्यामध्ये जगाच्या नकाशावर येणे दृष्टिक्षेपात दिसत आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर

हेही वाचा: Kokan : ई-पीक नोंदणी अत्यावश्यक

अशी होणार कांदळवन उद्यान निर्मिती

जुवे येथे कांदळवन उद्यान निर्मिती करण्याचा हालचाली गेल्या काही वर्षापासून वनविभागातर्फे सुरू आहेत. त्यामध्ये पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता निसर्ग पर्यटनाचा विकास, स्थानिक लोकांच्या संस्कृतीचे जतन व रोजगाराला चालना देणे, कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रस्तावित असलेला हा प्रकल्प सुमारे १०.६० हेक्टर क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा: Kokan : जिल्ह्यात भविष्यात मोठे उद्योग आणणार ; केंद्रीय मंत्री राणे

कांदळवन उद्यानाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार निर्मिती अंतर्गत खेकडा पालन, कोळंबी पालन, विविध रंगीत माशांचे उत्पादन करणे या बाबींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले जाते. या उद्यानामध्ये निसर्ग माहिती केंद्र, कांदळवन म्युझियम, तरंगते रस्त, जेटी, निरीक्षण मनोरे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यासाठी सुमारे दहा कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. सध्या हा प्रस्ताव निधीच्या मंजुरीसह विविध मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा: Kokan : चिपळुणात मासळीचे दर वाढले

जुवे गाव आणि मुंबईची गोदी असे अनोखे समीकरण

किरकोळ शेतीयोग्य क्षेत्र असलेल्या आणि निव्वळ सागरसंपत्तीवर अवलंबून असलेल्या जुवेवासीयांना काळानुरूप वाढत चाललेल्या लोकवस्तीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावू लागला. त्यातून, जुवेवासीयांनी मुंबईची वाट धरली. सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वीपासून स्थलांतरित झालेल्या गावातील अनेकांनी मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन मझगाव डॉक, नेव्हल डॉक, बाँबे पोर्टट्रस्ट, गोदी आदी ठिकाणी नोकरी मिळविली. दर्यावर्दी व सदृढ शरीरयष्टीची देणगी मिळालेल्या जुवे ग्रामस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रातकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

हेही वाचा: Kokan : कोकणचं पाणी मराठवाड्याच्या ऊसासाठी कशासाठी

एवढेच नव्हे तर, आपल्या पाठोपाठ येणार्‍या या गावातील प्रत्येकाला मदतीचा हात देत चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळवून दिल्या. त्यातून जुवे गाव आणि मुंबईची गोदी असे जणूकाही समीकरणच जुळले. खाडीतील मुळे, खेकडे, कालवे या सागरसंपत्ती व्यतिरीक्त उत्पन्नाचे साधन नसले तरी, यासंह मच्छीमारी करून जुवेवासियांनी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केल्याचे दिसते. कांदळवन निमिर्तीचा प्रकल्प येथे झाल्यास येथील ग्रामस्थ, महिलांना रोजगाराचे साधन निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील तरुणांना मुंबईसह अन्य ठिकाणी रोजगारासाठी भटकंती करावी लागणार नाही.

हेही वाचा: Kokan : कोकणचे राजकारण पोखरले व्यक्तीद्वेषाने

वैशिष्ट्यपूर्ण जुवे

ब्रिटिशकाळामध्ये राजापूरचे बंदर निर्यातीसाठी प्रसिद्ध होते. या बंदरामध्ये ज्या खाडीतून जहाजे येत होती, त्या जैतापूरच्या खाडीमध्ये विलीन होणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट वसले आहे. एका बाजूला जैतापूर बंदर, तर दुसऱ्या बाजूला देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, मारवेली गाव आदी गावांचा सहवास लाभलेल्या जुवे बेटाला समुद्राच्या निळाशार पाण्याने वेढा घातलेला आहे. या गावामध्ये जा-ये करण्याचा एकमेव आधार असलेल्या छबिन्यातून (छोटी होडी) सुमारे तीन किमीची समुद्रसफर करून गावात प्रवेश केल्यानंतर खर्‍या अर्थाने गावपणाची साक्ष मिळते. कोकणातील लोकांच्या पारंपरिक पद्धतीने बांधलेली उताराची कौलारू घरे मोठ्याप्रमाणात असली तरी गेल्या काही वर्षामध्ये चिरेबंदी आणि स्लॅबच्या घरांची उभारणी झाली आहे.

हेही वाचा: Kokan : गावखडीतील समुद्रकिनाऱ्यावरील सुरुबन धोक्यात

बहुतांश घरासमोरच्या अंगणात रेखाटलेली रांगोळी त्या घराच्या घरपणाची शोभा वाढविते. आंबा, फणस, नारळ, काजू, याबरोबरच वड, काजरा, धामन, किंजळ, पिंपळ आदी झाडांमुळे शांत आणि आल्हाददायक वातावरण आहे. मालवण येथील रेवंडी येथील श्री भद्रकाली देवी आणि अणसुरेचा श्रीदेव गिरेश्‍वर ही जुवेवासीयांची कुलदैवत असून गावामध्ये श्री रवळनाथच्या दोन प्रमुख मंदिरांबरोबर राईतील श्री सिमराई देवीची मंदिरे आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत आणि चौथीपर्यंतच्या शाळेची टुमदार आणि सुसज्ज इमारत आहे.

हेही वाचा: Kokan Railway : कोकण रेल्वेच्या दिवाळी विशेष गाड्या

छबिना हेच संपर्काचे एकमेव साधन

देवाचेगोठणे येथून खाडीतून वीजखांब टाकून १९८४ मध्ये गावात वीज आणण्यात आली आहे. जुवेचा जमिनीशी संपर्क व्हावा, यादृष्टीने माजी बांधकाम राज्यमंत्री ल. र. हातणकर यांच्या प्रयत्नाने खारलॅण्ड बंधाऱ्याला सुमारे १९८२ मध्ये खऱ्या अर्थाने चालना मिळाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार गणपत कदम यांनी त्याला मूर्त स्वरूप मिळवून दिल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. मात्र बंधाऱ्याची दरवर्षी होणारी झीज आणि दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आदींमुळे बंधारा ढासळला आहे. त्यामुळे जुवेवासीयांचे छबिना हेच संपर्काचे एकमेव साधन.

हेही वाचा: Kokan Railway : कोकण रेल्वेच्या दिवाळी विशेष गाड्या

‘स्वराज्य’तील घडामोडींचे साक्षीदार जुवे

औरंगजेबाकडून संभाजीराजेंना कोकणात संगमेश्‍वर येथे अटक होण्यापूर्वी पुढील परिणामांची संपूर्ण चाहूल लागलेल्या राजांनी सोबत असणाऱ्या ताराराणींना कोल्हापूरला सुखरूप पाठविण्यापूर्वी राजापूर किंवा सिंधुदुर्गात काही काळ ठेवण्याच्या सूचना मावळ्यांना केल्या होत्या. त्यावेळी ताराराणींना आरमाराने राजापूर खाडीमार्गे सिंधुदुर्गला नेण्यात येणार होते. ही जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी आरमारी मालोजी खोत शिंदे-कांबळी यांच्यावर सोपविली होती.

हेही वाचा: Kokan : कोकणचे राजकारण पोखरले व्यक्तीद्वेषाने

राजापूर खाडीच्या मुखावर व अरबी समुद्रालगत असलेल्या यशवंतगडावर असलेल्या पोर्तुगीजांमुळे ताराराणींना बाहेर नेणे शक्य नव्हते. त्यामुळे काही दिवस ताराराणींना सुरक्षित ठेवण्यासाठी नदी मुखावरील या जुवे बेटावर ठेवण्यात आले. काही दिवसांनी पुन्हा राजापूर-गगनबावडामार्गे ताराराणींना सुखरूप कोल्हापूरला पाठविण्यात आले. ही जबाबदारी पार पाडणाऱ्या मालोजी खोत शिंदे-कांबळींना हे बेट इनाम देण्यात आले. त्याकाळी कुणाचीही वस्ती नसलेल्या जुवे गावचे मालोजी खोत शिंदे-कांबळींना पहिले वंशज मानले जाते.