
गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रुळावर माती, वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर माती आल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रकावर परिणाम झाला. मांडवीसह मुंबईकडे जाणारी एक अशा दोन रेल्वे गाड्या दोन तास स्थानकातच थांबून होत्या. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा प्रकार दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला. (konkan railway route Dirt on tracks)
गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांसह उपनद्या, वहाळ भरुन वाहत आहेत. डोंगरातील झरे वेगाने प्रवाहीत झाले असून त्या पाण्याबरोबर मातीही वाहून येत आहे. त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. गुरुवारी (ता. 14) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान डोंगरातील माती रुळावर आली होती.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर तत्काळ कोकण रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोचून माती बाजूला करण्याचे काम सुरु केले. या प्रकारामुळे गाड्या धिम्या गतीने धावत आहे. चिपळूण ते खेड दरम्यान वाहतूक थांबविण्यात आली होती. मुंबईहून मडगावकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. तर चिपळूण स्थानकात मुंबईकडे जाणारी एक एक्स्प्रेस थांबविण्यात आली होती. माती काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याचे कोकण रेेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या तीन वर्षात कोकण रेल्वे मार्गावर माती येण्याच्या प्रकाराना आळा बसला होता. यंदा बर्याच कालावधीनंतर पहिल्याच टप्प्यातील पावसात माती खाली येण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकारामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. खेड स्थानकावर कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुचना दिल्या जात होत्या. परंतु गाडी कधी धावणार हे सांगितले जात नसल्याने प्रवाशांच्या नाराजीत भर पडली होती.
दरम्यान, अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आल्यामुळे आजची (दि. १४.०७.२०२२) १०१०३ मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली आहे. इतरही गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन काढून मदतकार्यासाठी नेण्यात आले आहे.