esakal | 'कुणी रेंज देत का रेंज ?' कोकणातील ही घटना कोणती ?
sakal

बोलून बातमी शोधा

lack of BSNL range in mandangad village before one month problem faced by konkan people in ratnagiri

अधिकाऱ्यांच्या कारभारावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

'कुणी रेंज देत का रेंज ?' कोकणातील ही घटना कोणती ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : तालुक्‍यातील देव्हारे येथील बीएसएनएलची २ जी रेंज महिन्याभरापासून गायब झाल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड असुविधा झाली आहे. घराघरातील साधे मोबाईल फोन शोभेच्या वस्तू बनून राहिल्या आहेत. ग्रामीण भागातील ही सेवा बंद असल्याने गैरसोयी आणि समस्या वाढल्या आहेत. दरम्यान, संबंधित अधिकारी उद्या, परवा चालू होईल, अशी उत्तरे देत असून ग्राहकांची बोळवण करताहेत. या अधिकाऱ्यांच्या कारभारावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

हेही वाचा - ....म्हणे काम दर्जेदार ; पण पूर्णगडाच्या भिंतीला गेले तडे 

देव्हारे येथे असणाऱ्या बीएसएनएल टॉवरमुळे परिसरातील कोन्हवली, ताम्हाणे, वडवली, आतले, कळकवणे, मालेगाव, धामणी, कुडुक बुद्रुक, सावरी गावांतील नागरिकांना मोबाईल सेवा मिळत होती. तसेच देव्हारे मुख्य बाजारपेठ असल्याने बॅंक, सोसायटी, शैक्षणिक कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. तसेच देव्हारे गावात अनेक वाड्यांचा समावेश असून घरोघरी बीएसएनएलचे ग्राहक आहेत. 

मात्र महिनाभरापासून २ जी सेवा बंद पडली आहे. फक्त अँड्रॉईड मोबाईलला रेंज मिळत असल्याने साधे फोन बंद झाले आहेत. ग्रामीण भाग असून असे फोन वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ही सेवा बंद असल्याने बॅंकेतून येणारे संदेश, अत्यावश्‍यक घटनेवेळी करावा लागणारा संपर्क बंद झाला आहे. परिणामी नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे ही सेवा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.

हेही वाचा - तीन पदरी बोगदा, त्यात दोन भुयारी मार्ग, कुठल्या घाटात सुरू आहे गतीने काम... वाचा

साध्या फोनचे करायचे काय?

फक्त अँड्रॉईड मोबाईल फोनला रेंज व कॉल सुविधा मिळत असल्याने साधे फोन फक्त खिशात ठेवण्याची वस्तू बनली आहे. तसेच ग्रामीण भाग असल्याने किंमती फोन घेणे परवडणारे नसल्याने आता करायचे काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

"महिनाभरापासून रेंज मिळत नाही. संबंधित अधिकारी उद्या, परवा चालू होईल, अशी उत्तरे देत आहेत. तर काहींना आता टू जी कार्ड संपले आहे, असे सांगितले जात आहे. या अनागोंदी कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत आहे."

- अरुण बैकर, देव्हारे

संपादन - स्नेहल कदम 

loading image