त्याला पकडले पण तो हातावर तुरी देऊन पळाला....

LED fishing Wangurla Sea  kokan marathi news
LED fishing Wangurla Sea kokan marathi news

मालवण (सिंधुदुर्ग) : वेंगुर्लेसमोरील समुद्रात वीस वावात अवैधरीत्या एलईडी पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणारा गोव्यातील ट्रॉलर मत्स्य व्यवसायच्या गस्तीनौकेने आज पहाटे तीनला पकडला. मात्र, ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे कारण पुढे करून हा ट्रॉलर पसार झाला. मत्स्य व्यवसायच्या पथकाने ट्रॉलरसोबत असलेली छोटी होडी, एलईडीचे बल्ब, जनरेटर, आवश्‍यक कागदपत्रे तसेच अन्य साहित्य जप्त केले. ट्रॉलरवरील खलाशी, तांडेल यांचे जबाब घेतले. या ट्रॉलरवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसायचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी सांगितले.

गोव्यातील ट्रॉलर पकडल्यानंतर तो येथील बंदरात आणण्यात येत होता. मात्र, वाटेत ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे कारण पुढे करून संबंधित ट्रॉलर व्यावसायिकाने शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी यावेळी केली.येथील समुद्रात परप्रांतीय हायस्पीड, एलईडी पर्ससीनधारक ट्रॉलर्स व्यावसायिकांनी मासळीची लूट सुरूच ठेवली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेवरून परवाना अधिकारी मुरारी भालेकर, पोलिस संदीप सरकुंडे, तांडेल नारायण हरचरीकर, प्रभाकर हरचरीकर यांच्या पथकामार्फत समुद्रात गस्त सुरू होती. मध्यरात्री त्यांनी एका एलईडी पर्ससीननेट ट्रॉलरचा पाठलाग केला. मात्र तो ट्रॉलर पळून जाण्यात यशस्वी झाला.

ट्रॉलरवर २७ खलाशी व तांडेल

याच दरम्यान वेंगुर्ले समुद्रातील वीस वावात एलईडी पर्ससीन ट्रॉलर अवैधरीत्या मासेमारी करत असल्याचे दिसून आल्याने शीतल गस्तीनौकेवरील पथकाने हा ट्रॉलर पकडला. ट्रॉलरची तपासणी केली असता ट्रॉलरचे नाव गौरी आयएनडी (जीए ०१ एमएम २९४३) असून तो बारदेस गोवा येथील सोनाली भोसले यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. या ट्रॉलरवर २७ खलाशी व तांडेल होते. यातील बारा जणांना पथकाने आपल्या नौकेत घेतले तसेच ट्रॉलरसोबत असलेली छोटी नौका, एलईडी बल्ब, जनरेटर, आवश्‍यक कागदपत्रे अन्य साहित्य जप्त केले. 

देशात एलईडी मासेमारीवपर पूर्णतः बंदी
ट्रॉलर येथील बंदरात आणण्यासाठी सुरू करण्यात आला; मात्र काही अंतरावर आल्यानंतर या ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गस्तीनौकेने छोट्या नौकेसह, खलाशी, तांडेल व जप्त केलेले साहित्य येथे आणले. या दरम्यान पकडलेला ट्रॉलर पळून गेला. आज ताब्यात घेतलेल्या तांडेल, खलाशांकडून मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवून घेतले. या ट्रॉलरवर कारवाईसाठी आजच तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती परवाना अधिकारी भालेकर यांनी दिली. देशात एलईडी मासेमारीस पूर्णतः बंदी असताना राज्याच्या सागरी हद्दीबाहेरही मोठ्या प्रमाणात एलईडीची मासेमारी सुरू असल्याचे काल कारवाई दरम्यान दिसून आल्याचे श्री. भालेकर यांनी सांगितले.

शासकीय यंत्रणा अपयशी

यामुळे केंद्राची शासकीय यंत्रणा एलईडीची अवैध मासेमारी रोखण्यास अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत ट्रॉलर पकडल्यानंतर पळून जाण्यासाठी परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांनी नवी शक्कल लढविली असल्याचे मत्स्यव्यवसायच्या कारवाईनंतर दिसून आले आहे. पथकाने कारवाई करून ट्रॉलर बंदरात आणत असताना तो सुरू होता. त्यानंतर अचानक ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे सांगून ट्रॉलरव्यावसायिकाने शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित ट्रॉलर मालकाविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी मच्छीमार नेते श्री. जोगी यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com