पळता भुई झाली थोडी ; जिन्यावरून बिबट्याने केली डायरेक्ट घरात एंट्री

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

देवरूख (रत्नागिरी) : साखरपा बाजारपेठेनजीक सोनार आळीजवळ राहणाऱ्या रजत भाटकर यांच्या घरात बिबट्याने ठाण मांडले. जिन्यावरून बिबट्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. बिबट्याच्या घरातील वावराचे चित्रण सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. भाटकर यांच्याकडील पाळीव प्राण्याचा मागोवा घेत हा बिबट्या तेथे आला असावा, अशी चर्चा आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांच्याजवळ असणाऱ्या पाळीव प्राण्याचा मागोवा घेत हा बिबट्या येथे येत असल्याचा अंदाज होता तो अखेर खरा ठरला. वन विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. साखरपा परिसरात अनेक भागात बिबटे खुलेआम फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या सीसीटीव्ही फुटेजमुळे याला दुजोरा मिळाला आहे. असा प्रकार होत राहिला तर जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा - चक्क बॅंकेचीच केली फसवणूक ; १४ लाखाचे नकली दागिने ठेवले गहाण -

परिसरातील पाळीव प्राणी या बिबट्यांमुळे संकटात सापडले असताना आता बिबट्या थेट घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागल्याने वन विभागाने ही घटना गांभीर्याने घेऊन याबाबत हालचाल करावी, अशी मागणी आहे. याबाबत भाटकर हे सुद्धा वन विभागाकडे तक्रार करणार आहेत. या आधीही एका बिबट्याने या परिसरातील एका घरात घुसून दोघांवर 
हल्ला चढवला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान, याबाबत वन विभागाला येथील नागरिकांनी कळवले; परंतु रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले नव्हते. या परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा संचार आहे. अनेकांना बिबट्याने दर्शन दिले असून गुरांवर हल्लेही केले आहे. त्यामुळे या परिसरात वन विभागाने पिंजरा बसवावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा -  सावंतवाडीत अज्ञाताने जाळली अल्टो कार

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard entry direct in house from devrukh ratnagiri people fear for that instance