बोगस कर्ज प्रकरण की चूक ? कर्ज ५ हजाराचे, कर्जमाफी ७० हजारांची !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

गोरगरिबांची फसवणूक करून बक्कळ पैसे कमविले असा अर्थ काढायचा का, असा प्रश्‍न पडतो.

रत्नागिरी : विकास सहकारी सेवा सोसायटीतून कर्ज घेतले ५ हजाराचे आणि कर्जमाफी झाली ७० हजार ३३५ रुपयाची. फसवणुकीचा हा अजब प्रकार पांगरी विकास सहकारी सेवा संस्थेमध्ये झाल्याची तक्रार एका खातेदाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे केली आहे. अशी अनेक बोगस कर्ज प्रकरणे केल्याचा संशय आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करा, असे विशाल सहदेव सुतार (सुतारवाडी-पुनर्वसन २) यांनी अर्जात म्हटले आहे. 

हेही वाचा -  क्षणिक रागातून दगडाने ठेचून केला युवतीचा खून 

विशाल सुतार यांनी सांगितले की, करक पांगरी विकास सहकारी सेवा संस्थेमधून ५ हजार रुपये तोंडी कर्ज घेतले होते. परंतु, कर्जमाफीच्या यादीमध्ये माझे ७० हजार ३३५ चे कर्ज माफ झाले, असे मला कळविले. प्रत्यक्षात मी फक्त तोंडी ५ हजार रुपये कर्ज घेतलेले होते. ६५ हजार ३३५ चे कर्ज मी घेतलेच नाही, तरी अहवालमध्ये मला कळले की, माझी कर्जमाफी झालेली आहे.

यावरून करक पांगरी वि. स. से. संस्थेचे माझ्या नावाने बोगस कर्जाचे प्रकरण केले, असा मला दाट संशय आहे. माझे कर्ज शेती कर्जामध्ये विलिन करून माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आहेत. तसेच ३१ मार्च २०१९ च्या सरकारी ऑडिट रिपोर्टमध्ये त्याच्या माफीचा उल्लेखही नाही. तसेच माफीत बसवलेली प्रापंचिक आणि घरदुरुस्ती कर्ज के. ए. आर (राजापूर) तसेच डी. डी. आर (रत्नागिरीच्या) मेमो सेलमध्ये दिसत आहेत. 

हेही वाचा - पोल्ट्री उद्योगाला पुन्हा अच्छे दिन 

सूत्रधार कोण...?  

गोरगरिबांची फसवणूक करून बक्कळ पैसे कमविले असा अर्थ काढायचा का, असा प्रश्‍न पडतो. शेतकऱ्यांचे बोगस कर्ज करण्यासाठी कोण सामिल आहेत, याची सखोल चौकशी करावी असे विशाल सुतार यांनी अर्जात म्हटले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loan amount of rupees 5000 but exact loan amount is 70000 in documents it is by default or fraud case in ratnagiri