कोळंबीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार ; कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळणार

मुझफ्फर खान
Friday, 9 October 2020

लोटे एमआयडीसीत कोळंबीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प येत असल्यामुळे येथील ग्रामस्थांनीही या प्रकल्पाचे स्वागत केले. 

चिपळूण : अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये कोळंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग नजीकच्या काळात सुरू होणार आहे. या प्रकल्पात सुमारे 400 हून अधिक कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कोरोनामुळे राज्यातील उद्योग अडचणीत आले असताना अतिरिक्त लोटे एमआयडीसीत कोळंबीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प येत असल्यामुळे येथील ग्रामस्थांनीही या प्रकल्पाचे स्वागत केले. 

हेही वाचा - रिक्त जागा, भरतीची तार येणार कधी ? 

अतिरिक्त लोटे एमआयडीसीसाठी असगणी, असगीणी मोहल्ला, सात्वीणगाव, लवेल व दाभीळ या गावातील सुमारे 690 हेक्टर क्षेत्र एमआयडीसीने संपादन केले. 1989 साली भूसंपादन प्रक्रियेला सुरवात झाली. 31 वर्षानंतरही अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. असगिणी ग्रामपंचायत, दक्षता समिती, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीमार्फत 27 वर्ष संघर्ष सुरू आहे. अतिरिक्त लोटे एमआयडीसीत रासायनिक प्रकल्प नको अशी संघर्ष समितीची मागणी आहे. येथे प्रस्तावीत असलेले सहा रासायनिक प्रकल्प संघर्ष समितीने रद्द करायला लावले. 

सद्यस्थितीत केवळ रेल्वेचे सुटे भाग बनविण्याचा कारखाना येथे सुरू आहे. आता एक्युआ फुड येझीम ही कंपनी कोळंबीवर प्रक्रिया करणारा कारखाना अतिरिक्त लोटे एमआयडीसीत उभारणार आहे. एक्युआ फुड येझीम ही कंपनी युरोपियन युनियन आणि अमेरिकन खाद्य मानकांनुसार जलचर आणि सागरी उत्पादने निर्यात करते. एक्युआ फुड येझीम कंपनीचे संचालक, एमआयडीसीचे अधिकारी यांनी स्थानिकांची बैठक घेतली. संदिप फडकळे, अशोक बुरटे, जावेद आंबेडकर, नदीम घारे, उस्मान झगडे, अजय शिगवण, अनवर झगडे आदींनी विचारलेल्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे दिली. कंपनीचा स्वतःचा ईटीपी प्लांट असेल. 400 हून अधिक तरूणांना येथे रोजगार मिळणार असल्यामुळे रोजगाराचे दालन येथे उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा -  रत्नागिरीकिनारी इसिस’च्या हालचाली ; पोलिस यंत्रणा अ‍लर्ट 

"अतिरिक्त लोटे एमआयडीसीतील कारखान्यात बर्फातून कोळंबी आणली जाईल. प्रक्रिया करून ते विदेशात पाठवली जाईल. या प्रकल्पामुळे कोणतेही प्रदुषण होणार नाही. कोरोनामुळे तरूणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. मुंबई, पुण्यातील तरूण गावात आले आहेत. त्यामुळे गावातील लोकांचा या प्रकल्पाला पाठींबा आहे."

- हुसैन ठाकूर, अध्यक्ष दक्षता समिती असगिणी

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lote MIDC start a new project of kolambi in ratnagiri people welcome this project