माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....?

Madkhole Villagers Untimely Fast In Madkhol Kokan Marathi News
Madkhole Villagers Untimely Fast In Madkhol Kokan Marathi News

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : माडखोल धरणाचे पाणी फेब्रुवारीपूर्वी गावासाठी सोडण्यात येईल, असे आश्‍वासन देऊनही संबंधित पाईपलाईनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वेळेत पाणी न मिळाल्यास ३ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करू, असा इशारा माडखोल ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन येथील लघु पाटबंधारे विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. कुंभार यांच्याकडे सादर करण्यात आले.

यात म्हटले आहे की, नोव्हेंबरमध्ये धरणाचे पाणी लाभधारक शेतकरी व पाटबंधारे विभाग यांचे एकत्रित सिंचन पूर्ण बैठक लावून माडखोल गावात शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत नियोजन केले जाते. मागील वर्षी झालेल्या सिंचन पूर्व बैठकीत उपविभागीय पाटबंधारे अधिकारी श्री. कांबळे यांनी कालवा दुरुस्तीचे काम मंजूर झाल्याचे सांगत हे काम जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन केले होते; परंतु या वर्षीचा जानेवारी संपला तरी सिंचन पूर्व बैठक लावण्यात आलेली नाही.

लेखी पत्राने कळविले; मात्र

याबाबत ४ डिसेंबर २०१९ ला माडखोलमधील शेतकऱ्यांनी लघुपाटबंधारे अभियंता संतोष कविटकर यांची भेट घेतली असता त्यांनी कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण करून २५ डिसेंबरला सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले. त्यावरही थकबाकी लावण्यात आली नाही. याबाबत १७ डिसेंबर २०१९ ला कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग आंबडपाल यांना सिंचन पूर्व बैठक लावून पाणी सोडण्यासाठी निवेदन दिले असता त्यांनीही कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणी सोडण्याचे लेखी पत्राने कळविले; मात्र यावरही कार्यवाही झाली नाही.

परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे....


यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी आपण गावासाठी पाणी सोडू, असे आश्‍वासन दिले होते; मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतेही नियोजन झालेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी याचा फटका परिसरातील शेतीसह गुरांना बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सरपंच संजय शिरसाट, माजी सरपंच अनिता राऊळ, सहदेव राऊळ, बाबूराव राऊळ, संतोष राऊळ, संजय राऊळ, सुरेश आडेलकर, महेश डेगवेकर, संदेश तेली, नयना राऊळ, गौरव राणे, लवू गावडे, नागेश सावंत, शालिनी सावंत, विजय राऊळ, रामचंद्र सावंत, चंद्रकांत माडखोलकर आदी उपस्थित होते.

निवेदनातील काही मागण्या अशा
कालवा दुरुस्तीचे काम हे गावातील धरणाच्या पाण्याचे लाभधारक शेतकऱ्यांची संस्था श्री देवी भराडी पाणीवापर संस्था यांना विश्‍वासात घेऊन करणे गरजेचे होते; मात्र या संस्थेचा कार्यकाल ३१ जुलैला संपून सहा महिने पूर्ण झाले आहे. पाणीवापर संस्थेची मुदत संपलेली असून त्यांची निवडणूक प्रक्रिया तत्काळ लावण्यात यावी. सिंचन पूर्व बैठक तत्काळ घ्यावी, तसेच पाटबंधारे विभागाच्या उदासीन धोरणामुळे कालवा दुरुस्तीसाठी आलेला ६८ लाखांचा निधी परत जाऊ नये, यासाठी आवश्‍यक असलेल्या कामाला मुदतवाढ द्यावी, आदी मागण्या 
निवेदनात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com