उमेदवारांचे धाबे दणाणले: मंडणगड नगरपंचायत निवडणुक आरक्षण सोडत जाहीर : Mandangad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेदवारांचे धाबे दणाणले: मंडणगड नगरपंचायत निवडणुक आरक्षण सोडत जाहीर

नव्या सोडतीने अनेक प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने प्रस्थापित व इच्छुक संभाव्य उमेदवारांचे धाबे चांगलेच दणाणले.

उमेदवारांचे धाबे दणाणले: मंडणगड नगरपंचायत निवडणुक आरक्षण सोडत जाहीर

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाचे पार्श्वभुमीवर लांबलेल्या मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत ता.15 नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. नव्या सोडतीने अनेक प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने प्रस्थापित व इच्छुक संभाव्य उमेदवारांचे धाबे चांगलेच दणाणले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दुपारी 2 वाजता खेडच्या प्रातांधिकारी भाग्यक्षी मोरे, तहसिलदार दत्तात्रेय बेर्डे, मुख्याधिकारी विनोद डौले यांनी शहरातील नागरीक व पत्रकार यांच्या उपस्थितीत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ओ.बी.सी. आरक्षणाच्या संदर्भातील निर्णय व सन 2011 च्या जनगणनेनुसार ही आरक्षण सोडत काढण्यात आली.

मंडणगड नगरपंचायतीमधील 17 जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 17 पैकी तब्बल 9 जागा, अनुसुचीत जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षीत ठेवून हे प्रभाग चिठ्ठीद्वारे निवडण्यात आले.

हेही वाचा: हातकणंगलेतील ऊस तोडी रोखणार : जय शिवराय किसान संघटनेचा इशारा

नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक; 1,2,8,12,15,17 हे 6 प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. प्रभाग क्रमांक 3 व 9 हे 2 प्रभाग नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रवर्गाकरिता राखीव झाले. प्रभाग क्रमांक 4,5,10,11,13,16 हे 6 प्रभाग सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाकरिता राखीव झाले आहेत. प्रभाग क्रमांक 6,7 हे 2 प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्या प्रवर्गाकरिता राखीव झाले . प्रभाग क्रमांक 14 हा 1 प्रभाग अनुसुचीत जाती महिला प्रवर्गाकरिता राखीव झाला आहे.

सोडत कार्यक्रमात सौरभ शिंदे व सोहम सापटे या दोन लहान मुलांचे हस्ते चिठ्या काढण्यात आल्या. गत नगरपंचायत निवडणुकीत निवडुन आलेल्या अनेक प्रस्थापित नगर सेवकांचे प्रभाग महिलांकरिता आरक्षीत झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला. नगरपंचायतीने राबविलेल्या सोडतीचे कार्यक्रमास नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अभिजीत राणे, मनोज मर्चंडे, विकास साळवी, रविंकुमार शिंदे, नितेश लेंढे, संदीप डीके, किरण साखरे, गणेश सापटे, मोहन तलार, व ग्रामस्थ उपस्थित होते.

मंडणगड नगरपंचायत प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे

प्रभाग क्रमांक 1 (आदर्शनगर) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 (बोरीचा माळ) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 (केशवशेठ लेंडे नगर) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, प्रभाग क्रमांक 4 (शिवाजीनगर) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक 5 (साई नगर) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक 6 (दुर्गवाडी 2) नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, प्रभाग क्रमांक 7 (सापटेवाडी ) नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, प्रभाग क्रमांक 8 (दुर्गवाडी 1) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 9 (भेकतवाडी) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, प्रभाग क्रमांक 10 (कोंझर) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक 11 (धनगरवाडी) सर्वसाधारण खुला प्रभाग क्रमांक 12 (तुरेवाडी कुंभारवाडी ) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 13 (बौद्धवाडी 1) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक 14 (बौध्दवाडी 2) अनुसुचीत जाती महिला, प्रभाग क्रमांक 15 (गांधी चौक 2) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 16 (गांधी चौक 1) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक 17 (तुरेवाडी- सोनारवाडी ) सर्वसाधारण महिला.

loading image
go to top