समन्वयच नसल्याने शिवसेना सरकार अपयशी : प्रवीण दरेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वॅब तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागले...

 

रत्नागिरी : गेल्या दोन महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वॅब तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागले. त्यामुळे येत्या आठ दिवसांत डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयापासून तालुक्यापर्यंत प्रशासनाशी समन्वय नसल्यानेच ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली.

रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर भाजपच्या कोकणातील आमदारांचे शिष्टमंडळ आले आहे. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.श्री. दरेकर म्हणाले, भाजप महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे. त्यामुळेच राज्यात काही समाधानकारक स्थिती नसल्यामुळे आम्ही जनतेकरिता आता उपापयोजना, आवश्यक तिथे निधी देत आहोत. प्रशांत ठाकूर यांनी 50 लाखांचा निधी पनवेलच्या रुग्णालयाकरिता दिला. आमचे सर्व आमदार आपला निधी कोरोना लढ्यासाठी देत आहेत. स्वॅब तपासणी व कोरोनाचे सर्व उपचार मोफत झाले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून हे सर्व उपचार मोफत व्हावेत, अशी मागणी केल्याचे आमदार दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा- गुहागरमध्ये कोरोना पाठोपाठ आता शाईची भिती...

वालावलकर रुग्णालयात स्वॅब तपासणीचा प्रस्ताव
मंत्रालयापासून तालुक्यापर्यंत कुठेही व्यवस्थेत समन्वय नसल्याचे दिसले आहे. शिवसेनेने मच्छीमार, आंबा, काजू, सुपारी, नारळ बागायतदारांना वार्‍यावर सोडले. इथल्या उद्योगांना कोणतेही पाठबळ नाही. आता लवकरच मोसमी पाऊस सुरू होणार आहे. तत्पूर्वी बांधावर बी-बियाणे देऊ, अशी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. हे बियाणे बांधावर मोफत मिळावे अशी मागणी दरेकर यांनी केली.व्यावसायिक, मध्यम, लघु उद्योजकांना आधाराची गरज आहे. मोदी सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात मच्छीमारांचा समावेश आहे. आता राज्याने स्वतंत्र पॅकेज घोषित केले पाहिजे. पालकमंत्री व परिवहन मंत्री असणार्‍या अनिल परब यांनी मोफत एसटीची घोषणा केली. पण ही घोषणा हवेतच विरली. कारण एसटी सुटली नाही व ज्यांनी पैसे भरले त्यांच्यासाठी सुद्धा एसटीने सोय केली नाही. एसटी गाड्या निर्जंतुकीकरण करून सोडायला हव्या होत्या. पण आपले अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकार भाजपवर आरोप करत आहे.

हेही वाचा-हाॅटेल व्यवसायिकांनी सरकारकडे केलीय ही मागणी

मुंबईकर, गावकर्‍यांमध्ये वाद नको

संसर्गाचा प्रादुर्भाव 100 टक्के होणार नाही, याची हमी दिली पाहिजे. तपासणी करूनच भूमीपुत्रांना येथे सोडावे. मुंबईकर व गावकरी मंडळी यांच्यात वाद पेटवले जात आहेत. याला शिवसेना सरकारच कारणीभूत आहे. कारण मुख्यमंत्री ठाकरे यांनी गावाला जाऊ नका, असे आवाहन केले आहे. कारण तिथे तपासणीची यंत्रणा नाही. अशा स्थितीत चाकरमान्यांनी करायचे काय? कोकणी माणूस व मुंबईकरांमध्ये दरी निर्माण होऊ नये याकरिता भाजप प्रयत्न करत आहे. असे वाद होऊ नयेत याकरिता पोलिस अधीक्षकांना सूचना दिल्याचे दरेकर यांनी सांगितले.
ज्या शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले त्या कोकणात शिवसेनेचे मंत्री फिरत नाहीत. रत्नागिरीचे पालकमंत्री येथे फिरतच नाहीत, व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रत्नागिरीत फिरत आहेत.

हेही वाचा-कोल्हापुरचे देशमुख आता ठाण्याचे अतिरीक्त आयुक्त

स्वॅब तपासणीसाठी अद्याप अर्जच नाही

माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, कोरोनावर आतापर्यंत उपाय सापडलेला नाही. म्हणजे तपासणी करणे हाच उपचार आहे. रत्नागिरीत अजूनही स्वॅबची यंत्रणा नाही. त्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही. हे सत्ताधार्‍यांचे अपयश असून अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे, असा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला. जिल्ह्यात 35 हजार लोक क्वारंटाईन असून सुमारे 350 बेडची व्यवस्था आहे. तसेच खासगी रुग्णालयातील बेड घेतले जाणार आहेत. दुर्दैवाने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली तर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का? हा खरा प्रश्‍न असल्याचे चव्हाण म्हणाले. मच्छीमार, पर्यटन उद्योजकांची बँकोसोबत बैठक घेऊन त्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याकरिता प्रयत्न झाले पाहिजेत, अशी सूचना दरेकर यांनी केली.

मंत्र्यांनी निर्णय घ्यायचे असतात

राज्यातील मंत्र्यांनी निर्णय घ्यायचे असतात, सल्ले मागून काय होणार अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. कोरोनामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या व तृतीय म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले. विद्यार्थी अभ्यासाला लागले. सत्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यूजीसीकडे तृतीय वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. हा बेजबाबदारपणा आहे, अशी टिका प्रवीण दरेकर यांनी केली.पत्रकार परिषदेला भाजपचे कोकण प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार भाई गिरकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवी पाटील, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार जठार आदी उपस्थित होते.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Praveen Darekar press conference in ratnagiri