Chiplun : खोटे बोलून मोदींकडून दिशाभूल; भाजपबरोबर छुपी युती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun palika
Chiplun : खोटे बोलून मोदींकडून दिशाभूल; भाजपबरोबर छुपी युती

Chiplun : खोटे बोलून मोदींकडून दिशाभूल; भाजपबरोबर छुपी युती

चिपळूण : शिवसेनेचे नगरसेवक शशिकांत मोदी चक्क खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. स्वामी मठ ते महाराष्ट्र स्कूल याच रस्त्याचे नामकरण डॉ. हेडगेवार करण्याचाच ठराव मोदी यांनी मांडला. तशी इतिवृत्तात नोंद आहे. सभेचे इतिवृत्त उपलब्ध आहे. तेही मोदी नाकारणार असतील तर त्यांनी थेट भैरीच्या मंदिरात येऊन सांगावे, असे थेट आव्हान महाविकास आघाडीचे सदस्य अविनाश केळसकर यांनी देऊन एक प्रकारे घरचा आहेरच दिला आहे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

शहरातील श्री स्वामी समर्थ मठ ते महाराष्ट्र हायस्कूल या रस्त्याला डॉ. बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्याचा ठराव शिवसेनेचे सदस्य शशिकांत मोदी यांनी सभागृहात मांडल्याने महाविकास आघाडीचे सदस्य चांगलेच संतापले आहेत, परंतु मोदी यांनी स्वामी मठ रस्ता नावाला विरोध केलेला नसून त्यापुढील नवीन रस्त्याला डॉ. हेडगेवार नाव देण्याचा तो ठराव असल्याचा खुलासा केला आहे, मात्र यामागील सत्यताच आता नगरसेवक केळसकर यांनी पुढे आणली आहे.

महाविकास आघाडीचे सदस्य नगरसेवक केळसकर यांनी मोदी यांनी मांडलेला ठराव आणि पडलेली मते यांचा सभागृहातील इतिवृत्तांतच समोर आणला आहे. त्यामध्ये विषय क्र. २३ स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याला डॉ. केशव बळीराम हेडगेवार असे नाव देणे असा स्पष्ट उल्लेख असून शशिकांत मोदी यांनी स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याला डॉ. हेडगेवार असे नाव द्यावे असा ठराव मांडला, असे लेखी नमूद केले. त्यावेळी शशिकांत मोदी, मोहन मिरगल, जयश्री चितळे, संजीवनी घेवडेकर या सेना सदस्यांसह राष्ट्रवादीच्या वर्षा जागुष्टे आणि भाजपच्या ५ सदस्यांनी मतदान केल्याची नोंद इतिवृत्तात आहे, असेही केळसकर यांनी पुराव्यासह दाखवून दिले आहे.

हेही वाचा: लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार

दिवसातून पन्नासवेळा श्री स्वामी समर्थांचे नाव घ्यायचे आणि मनातून मात्र त्यांच्या नावाला विरोध करायचा. हेच मोदी यांनी या ठरावाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. आता अंगाशी आल्यानंतर पुढील रस्त्याला हेडगेवार यांचे नाव देण्याचा ठराव केला म्हणून खोटे बोलत आहेत. स्वामी मठ हेच नाव कायम ठेवा म्हणून मी उपसूचना मांडली. त्याला मी तसेच सुधीर शिंदे, सफा गोठे, करामत मिठागरी, फैरोजा मोडक, संगीता रानडे, कबीर कादरी अशी ७ मते पडली हे देखील इतिवृत्तात नमूद आहे. तरीही मोदी खोटे बोलत आहेत, असे केळसकर यांनी सांगितले.

भाजपबरोबर मोदींची छुपी युती

शशिकांत मोदी म्हणतात ही शिवसेनेची भूमिका होती. मग हजर असलेले सेनेचे अन्य सदस्य तटस्थ का राहिले. त्यांनी मतदान का केले नाही, त्यांना पक्षाची भूमिका मान्य नव्हती की मोदी यांनी भाजपबरोबर छुपी युती करून सेना सदस्यांना गाफील ठेवले होते, असा प्रश्न केळसकर यांनी उपस्थित केला आहे.

loading image
go to top