Vidhan Sabha 2019 : वेळ पडल्यास मातोश्रीसमोर उत्तर देईन; राणेंचा इशारा

Narayan Rane speech in Sawantwadi
Narayan Rane speech in Sawantwadi

सावंतवाडी - सिंधुदुर्गात दोन सभा घेतलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासावर काय सांगितले. कोणती दुरदृष्टी दिली ? सतरा मिनिटांच्या भाषणात पंधरा मिनिटे नारायण राणेवरच बोलले. वेळ पडल्या माझ्यावरील टिकेला मातोश्रीच्या समोर उत्तर देईन. त्यांनी मागील पंचवीस वर्षात मी केलेली कामे जरी सांगितली असती तरी चार तास लागले असते, असा पलटवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे केला.

येथील मातृछाया मंगल कार्यालयात राणेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुखांनी काल (ता.16) केलेल्या टिकेच्या अनुषंगाने श्री. राणे यावेळी बोलले.

ते म्हणाले, “गेली पाच वर्ष तुम्ही सत्तेत आहात. आमदार, खासदार तुमचे आहेत, असे असताना ठाकरे यांचे या जिल्ह्यासाठी योगदान काय ? मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला आहे की जिल्ह्यातील तिनही आमदार निवडून आणणार. त्यामुळे असे काम करा की भविष्यात भाजपच्या विरोधात कोणीही उभा राहणार नाही. कोकणच्या विकासासाठी मी बांधील आहे.”

ते म्हणाले, “शिवसेनेचे नेते माझ्यावर जी वैयक्तिक टीका करत आहेत त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या कार्यपद्धतीवर, माझ्या व्हिजनवर टिका करावी. ते त्यांना जमणार नाही. पालकमंत्री केसरकर यांनी मंत्री पदाचा वापर राणेंवर टीका करण्यासाठी केला. माझ्यावर टीका करून हे उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले वजन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही गेली दहा वर्षे आमदार आहात. पाच वर्षे राज्यमंत्री होता, मग विकास कोणता केला ? निदान मी आणलेले प्रकल्प त्यांनी पूर्ण केले का ? याउलट कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आमदार म्हणून कसे काम केले ते केसरकर यांनी पाहावे.

आमदार वैभव नाईक हे देखील आमदार म्हणून अपयशी ठरले आहेत. विधिमंडळात हे कधीच उभे राहिले नाहीत. विधिमंडळातील कामकाजाबद्दल नाईक यांना कोणतीही माहिती नाही. मग अशा माणसांना पुन्हा निवडून देऊन कोकणला मागे टाकण्यापेक्षा आपल्या तिनही उमेदवारांना निवडून द्या.”

ते म्हणाले, “शिवसेना पक्ष प्रमुखांनी जाहीर सभेत माझ्यावर वैयक्तीक टीका करण्यात धन्यता मानली. मला कोकणातील तरुण बेकार आहेत त्यांच्यासाठी रोजगार कसा मिळेल, कोकणचा विकास कसा होईल याबाबत बोलणार असे मला अपेक्षित होते; मात्र त्यांनी केलेल्या माझ्यावरील टिकेला वेळ पडल्यास मातोश्रीच्या समोर जाऊन उत्तर देईन.”

याचसाठी राणेंचा भाजपमध्ये प्रवेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात चांगले काम केले आहे. त्यामुळेच कोकणचा विकास होण्यासाठी मी भाजप प्रवेश केला आहे. मला देवाने सर्व काही दिले आहे. आता मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही; मात्र गेल्या पाच वर्षात कोकणचा रखडलेला विकास पूर्ण व्हावा, येथील बेरोजगारांना रोजगार मिळावा, सुख, समृद्धी यावी, यासाठी मी भाजपवासी झालो आहे. कारण विकास करायचा असेल तर सत्ता हवी. सत्तेशिवाय विकास शक्य नाही. आपण भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात जाण्याने जिल्हा विकसित होईल, असेही खासदार राणे म्हणाले.

भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली, संजू परब, सुधीर आडिवरेकर, प्रमोद कामत, सभापती पंकज पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, राजू बेग, संदीप नेमळेकर, मनोज नाटेकर, नगरसेवक उदय नाईक, अ‍ॅड. परिमल नाईक, किरण सावंत, अन्वर खान आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com