

Mumbai-Goa Highway
esakal
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या आरवली ते टळेकांटे टप्प्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने शासकीय महसूल बुडविल्याचा प्रकार पुढे आला आहे. प्रतिघनमीटर २१६ रुपयांची शासकीय रॉयल्टी न भरता कंपनीने सोनवी नदीपात्रातून पाच हजार घनमीटर गाळाचा बेकायदेशीर उपसा केला. तर वांद्री येथे नियमांचे उल्लंघन करत ५९ हजार ९१० ब्रासचे उत्खनन केले. जिल्हा खनिकर्म विभागाने यावर तीन कोटी ५९ लाख ४३ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली होती; परंतु ती धाब्यावर बसविली आहे. त्यांच्यावरील पुढील कारवाईचा प्रस्ताव प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठविला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथील गणेश विसर्जन घाटासमोर सोनवी नदीतील गाळ काढून खोदाई करण्याची कोणतीही परवानगी जलसंपदा विभागाने दिलेली नव्हती. तरीही पाच हजार घनमीटर गाळाचा उपसा केला. प्रतिघनमीटर २१६ रुपये रॉयल्टी भरणे बंधनकारक असताना महामार्गाच्या कामाचे नाव पुढे करत कंपनीने एक रुपयाचीही रॉयल्टी भरलेली नाही.
महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या खडीचा पुरवठा करण्यासाठी कंपनीने वांद्री येथे क्रशर उभारला. तेथे ५९ हजार ९१० ब्रासचे बेकायदेशीर उत्खनन केले. या चोरीच्या उत्खननामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने कंपनीला तीन कोटी ५९ लाख ४३ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली होती. शासनाच्या ३ मे २०२१च्या अध्यादेशानुसार, दंडाची रक्कम एका महिन्याच्या आत न भरल्यास ती पाच पटीने वाढविण्याची स्पष्ट तरतूद आहे.
त्यामुळे संबंधित कंपनीवरील दंड आता १७ कोटी ९७ लाख ३० हजार रुपयांवर पोहोचला आहे. संबंधित दोन्ही विभागांनी याला दुजोरा दिला आहे. इतकी मोठी दंडाची रक्कम थकीत असताना आणि कंपनी जिल्हा प्रशासनाला जुमानत नसतानाही अधिकारीवर्ग मात्र मूग गिळून आहे.
दंडाच्या नोटिसीवर कारवाई नाही फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांना ३ कोटी ५९ लाखाच्या दंडाची नोटीस दिली आहे; परंतु अजून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वरिष्ठांना याबाबत कळविण्यात आल्याचे खनिकर्म विभागाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.