मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची गती वाढली ; खवटी - परशुराम घाट मार्ग वाहतूकीसाठी खुला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

चौपदरीकरणावरून धावणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची बचतदेखील होते.

खेड : मुंबई- गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे व तालुक्‍यातील वेरळ येथे पूल उभारण्याचे काम ठेकाधारक कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीकडून सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे महामार्गावर बहुतांश ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाची गती मंदावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चौपदरीकरणाच्या कामासह अंतर्गत विविध कामांची गती कमालीची वाढली आहे. 

हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरांच्या विस्तारीकरणाचे काम फास्ट ट्रॅकवर -

मुंबई- गोवा मार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या ४४ किलोमीटर अंतरापैकी ३८ किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी खुलादेखील झाला आहे. या चौपदरीकरणावरून धावणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची बचतदेखील होते. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. 

भोस्ते घाटातील चार किमीचा मार्गदेखील वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांची कसरत थांबली आहे. कोरोनाच्या लॉकडाउननंतर चौपदरीकरणाच्या कामात खंड पडला होता. मेअखेरपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंपनीने कंबर कसली होती; मात्र कोरोनामुळे सलग दोन महिने चौपदरीकरणाचे काम थांबल्यामुळे रखडलेली कामे पूर्णत्वाकडे नेण्याकडे कंपनीचा कल आहे. लॉकडाउनमध्ये आलेल्या शिथिलतेनंतर कंपनीने चौपदरीकरणाची अंतर्गत कामे हाती घेतली.

भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे कामदेखील सद्यःस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. या पाठोपाठ महामार्गावर ठिकठिकाणी पुलांची उभारणीदेखील करण्यात येणार आहे. कळंबणीसह अन्य ठिकाणी पुलांची उभारणी पूर्ण झाली आहे. 

हेही वाचा - कमी खर्चात, कमी वेळेत मिळवा गुंठ्याला दोनशे किलो भात -

सपाटीकरणास सुरवात

वेरळ फाट्याजवळ पूल उभारण्यात येणार असून, गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी कंपनीने सपाटीकरणास सुरवात केली आहे. सपाटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी कंपनीची यंत्रणा दिवसानंतर राबवत असल्याने हा पूलदेखील लवकरच पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai goa highway working fastly after lockdown in ratnagiri khed it's easy to travel