महाविकास आघाडीमुळे राणेंना 'येथे' बसणार धक्का

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

राज्यात नावलौकिक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवरून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना हटवून पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या खासदार नारायण राणेंच्या प्रयत्नांना नव्याने आकाराला आलेल्या महाविकास आघाडीमुळे खीळ बसली आहे

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) : राज्यात नावलौकिक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवरून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना हटवून पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या खासदार नारायण राणेंच्या प्रयत्नांना नव्याने आकाराला आलेल्या महाविकास आघाडीमुळे खीळ बसली आहे. श्री. सावंत यांना हटविण्याइतके संचालकांचे संख्याबळ भाजपकडे नसल्यामुळे तूर्तास जिल्हा बॅंकेत सत्तांतर कठीण असल्याचे मानले जात आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश सत्ताकेंद्रे खासदार नारायण राणेंच्या अधिपत्याखाली होती. यामध्ये जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक या महत्त्वाच्या दोन संस्था राणे समर्थकांच्या ताब्यात होत्या. विधानसभा निवडणुकीत राणेंचे समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी राणेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नीतेश राणेंच्या विरोधात निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा - सिंधुदुर्गातून मंत्रीपदी कोणाची लागणार वर्णी ? 

जिल्हा बॅंकेवर गेल्या काही वर्षांपासून राणेंचेच प्राबल्य

श्री. सावंत यांनी साथ सोडल्यानंतर तत्काळ जिल्हा बॅंकेत सत्तांतर होण्याच्या चर्चेला सुरूवात झाली. मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी तर जिल्हा बॅंकेचे पुढील अध्यक्ष अतुल काळसेकर असतील, असे अनेक सभांमध्ये जाहीर करून टाकले. जिल्हा बॅंकेवर गेल्या काही वर्षांपासून राणेंचेच प्राबल्य होते. श्री. सावंत हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यांना हटवून पुन्हा बॅंकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू होत्या; मात्र जिल्हा बॅंकेत सावंतांना मानणारा संचालकांचा मोठा वर्ग आहे.

हेही वाचा - कोकणवासियांना दिलेली आश्वासने शिवसेना पाळणार का ? 

राणेंसोबत असलेले संचालक सावंतांसोबत

बॅंकेचे 19 संचालक असून त्यातील बहुसंख्य विविध पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत. ज्यावेळी जिल्हा बॅंकेचे निवडणूक झाली त्यावेळी नारायण राणे कॉंग्रेसमध्ये होते. त्यावेळी कॉंग्रेसचे 13 संचालक निवडून आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 5 तर भाजपचा एक संचालक निवडून आला होता. राणेंनी कॉंग्रेस सोडली त्यावेळी मूळ कॉंग्रेसच्या तीन संचालकांनी कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केले. उर्वरित 10 संचालकांनी राणेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. राणेंसोबत असलेल्या संचालकांपैकी निम्म्याहून अधिक आता श्री. सावंतांसोबत आहेत, अशी चर्चा आहे.

हेही वाचा - चोर आले, रे चोर आले, शेरेबाजीवर भाजपनेते म्हणाले, तुम्ही महाचोर 

जिल्हा बॅंकेची निवडणूक येत्या जूनमध्ये होण्याची शक्‍यता 

 राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी आकारास आली आहे. राज्यातील राजकीय समीकरणानुसार जिल्हा बॅंकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे 8 तर सतीश सावंत यांच्यासोबत किमान पाच पेक्षा अधिक संचालक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर राणेंना पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यास महाविकास आघाडीचा मोठा अडसर आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक येत्या जूनमध्ये होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी आता भाजपला निवडणुकीची वाट पाहावी लागण्याची शक्‍यता आहे. 

 सत्ता बदलली तरी... 

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांचे दीर्घकाळ वर्चस्व होते. श्री. जाधव हे शरद पवार यांना मानायचे. त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपदही भूषवले होते. पुढच्या काळात राणे यांनी ही बॅंक आपल्या ताब्यात घेतली. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या नियंत्रणात असताना या बॅंकेच्या प्रगतीचा आलेख मात्र चढता राहिला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane Lose Sindhudurg District Bank Due To Mahavikas Aghadi