लॉकडाऊनचा फायदा घेत चोरट्यांनी साधला डाव ; चिपळूणात सात ठिकाणी घरफोडी

मुझफ्फर खान
Thursday, 17 September 2020

परशुराम नगर मधील शालोम गल्ली येथील 3 फ्लॅट आणि डीबीजे महाविद्यालया समोरील प्रिती अपार्टमेंटमधील एक फ्लॅट चोरट्यांनी फोडला.

चिपळूण : शहरातील परशुराम नगर आणि मुंबई - गोवा महामार्गालगत सात ठिकाणी चोरट्यांनी पाच फ्लॅट, एक बंगला आणि एक हॉटेल फोडले. बंद असलेली घरे चोरट्यांनी फोडली खरी परंतू त्यांच्या हाती फार काही लागले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. बंगल्यात चोरट्यांचे साहित्य आढळून आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवास वसाहतीमधील एक फ्लॅट चोरट्यांनी फोडले. परशुराम नगर मधील शालोम गल्ली येथील 3 फ्लॅट आणि डीबीजे महाविद्यालया समोरील प्रिती अपार्टमेंटमधील एक फ्लॅट चोरट्यांनी फोडला. 

महामार्गालगत प्रशांत बुकडेपोच्या समोरील साळवी यांचे हॉटेल चोरट्यांनी फोडले. तसेच चंद्रकांत सुर्वे यांचा बंगला फोडला आहे. बुधवारी रात्री 9 ते गुरूवारी सकाळी 7 च्या दरम्यान या चोर्‍या झाल्या आहेत. चोरट्यांनी फोडलेली घरे, फ्लॅट आणि हॉटेल काही दिवसापासून बंद आहेत. चिपळूणात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे काहींनी चिपळूणातील फ्लॅट बंद करून गावात राहणे पसंत केले आहे. तर काही फ्लॅट येथून परजिल्ह्यात बदली झालेल्या अधिकार्‍यांचे आहेत. 

 हेही वाचा - लाखाचे झाले बारा हजार ; मॅच्युरिटीनंतर मिळाली फक्त निम्मीच रक्कम, कुठे घडली घटना ? 

 

लॉकडाऊनमुळे महामार्गालगतचे हॉटेल काही दिवस बंद आहे. चंद्रकांत सुर्वे यांचा बंगलाही काही दिवसापासून बंद असून ते परगावी गेले आहेत. चोरट्यांनी कडी वाकवून बंगल्याचे दार उघडले आणि आतमध्ये प्रवेश केल्याचे दिसत आहे. हीच पद्धत त्यांनी फ्लॅट आणि हॉटेल फोडताना वापरली आहे. बंगल्यातील कपाट फोडून आतील बॅगा उपसलेल्या आहेत. फ्रीजमधील दोन पाण्याच्या बाटल्या काढून यातील एक बाटली टेबलावर तर दुसरी बाटली दरवाज्या समोर ठेवलेली आढळून आली. बंगल्याच्या टेरेसकडे जाणारा दरवाजाही उघडलेला आढळून आला. सुर्वे यांच्या बंगल्यात चोरटे आपली पक्कड विसरून गेले. 

सकाळी सात वाजता ही घटना उघड झाल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा सुरू केला. चोरी झालेली घरे बंद होती त्यामुळे घरांचे मालक कोण आहेत. त्यांच्या घरात रोख रक्कम आणि इतर कोणकोणते साहित्य होते त्यापैकी चोरट्यांनी काय पळविले याचा तपशील उपलब्ध करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. फ्लॅट मालकांशी पोलिसांचे संपर्क साधून देण्याचे काम नगरसेवक शशिकांत मोदी यांनी केले. प्रिती अपार्टमेंटच्या समोर असलेल्या पल्लवी अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यात चोरटे कैद झाल्यामुळे पोलिसांनी या कॅमेर्‍याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.

 हेही वाचा - तरीही त्या कोरोना रुग्णांना भेटतात आणि दिलासा देतात ; कोकणात अशाही एक कोरोना योद्धा 

 

चंद्रकांत सुर्वे मुंबईत राहतात. चिपळूणला आल्यानंतर ते आपल्या पेन्शनमधील काही रक्कम मंदिरांना देणगी म्हणून देतात. बंगल्यातील देवघरात त्यांनी वीस हजार रुपये मंदिरांना देणगी म्हणून देण्यासाठी ठेवले होते. चोरटे बंगल्यात शिरल्यानंतर देवघरापर्यंत गेले. तेथील चांदीच्या काही वस्तू चोरल्या पण वीस हजार रुपये त्यांना मिळाले नाही. पंचनामा करताना पोलिसांना हे वीस हजार रुपये आढळून आले. सुर्वे यांचे मेव्हणे संदिप मोहिते यांना पोलिसांनी ती रक्कम दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: near mumbai goa highway road theft in seven location in chiplun ratnagiri