esakal | Good News : चिपळूणला मिळाली पहिली महिला वैमानिक
sakal

बोलून बातमी शोधा

nidhi bhosale is the first woman pilot in chiplun ratnagiri

बॉम्बे फ्लाईंग क्लब मधून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील ती कोकणातील एकमेव महिला वैमानिक आहे. 

Good News : चिपळूणला मिळाली पहिली महिला वैमानिक

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : चिपळूण तालुक्याला पहिली महिला वैमानिक मिळाली आहे. निधी भोसले असे तिचे नाव आहे. चिपळूणात व्यापार्‍याच्या मुलीने वैमानिक होण्याचा बहुमान मिळवला आहे. बॉम्बे फ्लाईंग क्लब मधून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील ती कोकणातील एकमेव महिला वैमानिक आहे. 

हेही वाचा - आयुष्यभर गोपालन करणार्‍या व्यंक्या लांबोरची एक्झिट चटका लावणारी...

महाराष्ट्राला कोकणच्या मातीने अनेक रत्न दिले आहेत. प्रत्येक क्षेत्रात कोकणातील लोकांनी आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे. निधी भोसलेच्या रुपाने कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. निधी भोसले हिचे प्राथमीक शिक्षण चिपळूणात झाले. 2017 मध्ये डीबीजे महाविद्यालयातून ती बारावी उत्तीर्ण झाली. नंतर मार्च 2018 मध्ये तिने बॉम्बे फ्लाईंग क्लबमध्ये बीएससी आणि कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला. कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळवण्यासाठी 200 तास विमान चालवावे लागते. तसेच सहा पेपर सोडवावे लागतात. 

देशातील हजारो तरूण बॉम्बे फ्लाईंग क्लबमध्ये वैमानिक होण्याचे स्वप्न घेवून येतात. कोणी अभियांत्रिकीची पदवी घेवून येतो तर कोणी वेगवेगळ्या शाखेतील पदवी घेवून येतो. 
पाच ते सहा वर्ष प्रशिक्षण घेवून सुद्धा अनेकांना वैमानिक होता आलेले नाही. मात्र वयाच्या 20 व्या वर्षी 200 तास विमान चालवणारी आणि सहा पेपर पहिल्या फेरीत सोडविणारी निधी ही पहिलीच विद्यार्थ्यांनी आहे. चिपळूणातील होलसेल विक्रेते मंगेश भोसले यांची ती मुलगी आहे. 

हेही वाचा -  ग्रामस्थांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र...

मध्यमवर्गीय कुटूंबातील  निधीला पायलट होण्याचे स्वप्न होते. मात्र पायलट होण्यासाठी तीस लाखा रुपये खर्च येतो.  निधीने बॉम्बे फ्लाईंग क्लबमधील गुणवत्ता आणि पायलट होण्यासाठीचे पेपर पहिल्या फेरीत चांगल्या गुणानी सोडविले म्हणून टाटा ट्रस्टने तिला दहा लाखाची शिष्यवृत्ती दिली.  1 वर्ष 2 महिने तिने धुळे येथे सिंगल इंजिन विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे मल्टी इंजिन विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती हैद्राबादला गेली. तेथे 22 दिवस तिने प्रशिक्षण घेतले. निधीची गुणवत्ता पाहून तिला 2 कंपन्यांकडून नोकरीची ऑफर आहे. मात्र तिला एअर लायन्समध्येच करिअर करायचे असल्याचे तिने सांगितले. 

संपादन - स्नेहल कदम