esakal | रत्नागिरी : कोरोनाला रोखायचंय, नियम पाळले नाहीत तर कठोर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

night curfew declared by collector in ratnagiri for precaution of corona

कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला. 

रत्नागिरी : कोरोनाला रोखायचंय, नियम पाळले नाहीत तर कठोर कारवाई

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर करत कडक धोरण अवलंबले आहे. जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. क्रीडा स्पर्धा, सार्वजनिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहे. 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास बंदी घातली असून मास्क अनिवार्य केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला. 

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूने बाधित व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी आदेश जारी करून नवीन निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत संचारबंदी लागू केली आहे. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेसाठी नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. या वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा -  मनसेच्या नगराध्यक्षांना दिली साथ ; सेनेच्या भूमिकेची जोरदार चर्चा -

विविध क्रीडा स्पर्धांसाठी (कबड्डी, क्रिकेट, खो-खो) प्रातांधिकार्‍यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. स्थानिक प्राधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय आठवडा बाजार, जनावरांचे बाजार भरवता येणार नाहीत. कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक समारंभ, साखरपुडा, मुंज, पूजा, आरती, नमाज आदीसाठी 50 लोकांचीच मर्यादा राहणार आहे. त्यासाठीही उपविभागीय अधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. उद्याने, मोकळ्या जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्रकिनारे अशा ठिकाणी एकाच वेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

मास्क न घातल्यास 500 दंड

जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्कचा वापर न केल्याचे दिसून आल्यास अशा व्यक्तींकडून 500 रुपये दंड आकारण्याबाबत आदेश जारी केला आहे. केवळ मास्क जवळ बाळगून त्याचा वापर न करणे किंवा योग्य रितीने वापर न करणे या बाबीही मास्कचा वापर न करणे यात धरण्यात येतील. याबाबत कारवाईचे आदेश नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत. 

"रात्रीच्या वाहतुकीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. त्यांनाही यापूर्वीच मर्यादा घालून दिल्या आहेत. कोरोनाचे अनेक नवे प्रकार समोर येत आहेत. लक्षणे नसताना किंवा काही त्रास होत नसतानाही अनेकजणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे आणि मास्क सर्वांना बंधनकारक केले आहे."

- दत्तात्रय भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी

हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार -

संपादन - स्नेहल कदम