सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी कोणी कोणी केलेत अर्ज ? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

कॉंग्रेस, शिवसेनेसह भाजपने शक्‍तिप्रदर्शन केले. सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्षपदासाठी 29 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवारांकडून 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. 
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाकडून वातावरणनिर्मिती केली.

कॉंग्रेस, शिवसेनेसह भाजपने शक्‍तिप्रदर्शन केले. सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यासह जावेद शेख, अमोल साटेलकर, बबन साळगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

नार्वेकर, कुडतरकर, पोकळे, दळवी, परब यांचे अर्ज

कॉंग्रेसकडून माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, शिवसेनेकडून नगरसेवक खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, शिवसेनेकडून डमी म्हणून माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, राष्ट्रवादीकडून पुंडलिक दळवी, भाजपकडून संजू परब यांचा समावेश आहे. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी याआधी अपक्ष दोन, तर भाजप म्हणून एक असा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे एकूण नऊ उमेदवारांकडून 12 अर्ज दाखल झाले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून यांचा अर्ज 

संजू परब यांचे शक्तिप्रदर्शन

भाजपकडून संजू परब यांनी शक्‍तिप्रदर्शन करत रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आमदार नितेश राणे यांनी शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांनी काढलेल्या मिरवणुकीत माजी खासदार नीलेश राणे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॉंग्रेसकडूनही रॅली काढत दिलीप नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेनेही शक्तिप्रदर्शन केले. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने उमेदवारासह सोबत कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रांत कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. 

हेही वाचा - जनतेच्या आग्रहाखातर भाजपने यांना दिली उमेदवारी

आज छाननी 

उमेदवारासोबत मोजकेच कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी सोडण्यात येत होते. आज दुपारी तीनपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहिली. उमेदवारी दाखल केलेल्या 12 अर्जावर उद्या (ता.13) सकाळी 11 वाजता छाननी प्रक्रिया पार पडणार आहे, असे श्री. खांडेकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Candidates For Sawantwadi Corporation President Election