जिल्ह्याच्या हितासाठी आम्ही उद्रेकाच्या उंबरठ्यावर : नितेश राणेंचा इशारा ..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

 लॅब न झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा मृत्यू झाल्यास प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणार.

ओरोस (सिंधुदुर्ग) : आमच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजला कोरोना लॅब उभी करायची नसल्यास शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या कॉलेजमध्ये ती उभी करा; परंतु लॅब लवकर सुरू करा. कारण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अहवाल प्रलंबित आहेत. अनेक दिवस क्वारंटाईन व्यक्तींना आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहोत, हे समजत नाही.

 लॅब न झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा मृत्यू झाल्यास प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणार. जिल्ह्याच्या हितासाठी आम्ही उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहोत, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी आज  जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी त्यांनी आम्हाला मान्यता देवून मशनरी पुरविल्यास पडवे कॉलेजमध्ये 20 दिवसात लॅब सुरु करू शकतो, असे आश्‍वासन दिले.

हेही वाचा- ऑनलाईन शिक्षण चांगलेच ; पण शिक्षण खात्याने आधी याचा विचार केलाय का?

कोरोना लॅब त्वरीत सुरू करा
भाजपच्या शिष्टमंडळाने आज दुपारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय चाकुरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज येथे कोरोना लॅब उभारण्यासाठी लेखी प्रस्ताव मंजुलक्ष्मी यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांनी जिल्ह्याची परिस्थिती गंभीर आहे. याच्यावर वेळीच तोडगा काढा. अन्यथा हातातून परिस्थिती निसटुन जावू शकते. योग्य नियोजन करा, असा सल्लाही जिल्हाधिकारी यांना दिला.

हेही वाचा- कोरोना इफेक्ट : मत्सदुष्काळ शासनाच्या अजेंड्यावर मागे पडण्याची भिती -

आमची बदनामी करायची, हे योग्य नाही.
यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “सत्ताधारी लोकांना गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यांना राजकारण करायचे आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक खरी माहिती देत नाहीत. आमच्या पडवे कॉलेजमध्ये लॅब सुरु करण्याचा विचार शिवसेनेच्या एका नेत्यांने 11 मेस झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पुढे आणला. त्यामुळे राजन तेली यांच्या मोबाईलवरुन खासदार नारायण राणे यांच्याशी पालकमंत्री यांनी संपर्क साधत ही मागणी केली. त्याला खासदार राणे यांनी मान्यता दिली. सीएस डॉ. चाकुरकर यांनी आपल्या बरोबर संपर्क साधुन तशी मागणी केली. आम्ही त्याला मान्यता दिल्यावर पालकमंत्री यांनी आमच्या कॉलेजची बदनामी सुरु केली. आम्ही एकीकडे जिल्ह्याच्या भवितव्यासाठी मदतीचा हात पुढे करायचा; मात्र यांनी आमची बदनामी करायची, हे योग्य नाही.”

हेही वाचा- महापालिकेने कोरोनाला रोखले...आता मात्र याचा धोका -

प्रशासनाने काय दिले ?
ते म्हणाले, “चाकरमानी गावात येणारच. तो त्यांचा अधिकार आहे; पण त्यांना आणण्यापूर्वी योग्य नियोजन करा, अशी आपण मागणी केली होती. सर्वपक्षीय बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, आरोग्य सभापती यांना निमंत्रण नाही. त्यांना खरोखरच राजकारण यात करायचे नसते तर त्यांनी मला वेळीच निमंत्रण दिले असते. खासदार राणेंना बोलाविले असते. आम्हाला जर राजकारण करायचे असते तर आम्ही मदतीचा हात पुढे केलाच नसता. प्रशासनाने काय दिले ? पीपीई किट आम्ही वाटले. नियोजनअभावी मोठ्या संख्येने दाखल झालेल्या चाकरमान्यांची जबाबदारी सरपंचांवर दिली. त्यांना या 60 दिवसांत एक तरी रुपया शासनाने दिले का ? मोठ्या प्रमाणात दाखल होणार्‍या चाकरमान्यांचे योग्य नियोजन न झाल्याने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर आहे.”

यावेळी श्री. जठार म्हणाले, “2013 मध्ये माकडताप लॅब मंजूर झाली. त्याच्या मशनरी येवून जिल्हा रुग्णालयात धुळ खात पडल्या आहेत; मात्र अजुन लॅब उभी झालेली नाही. अशी स्थिती कोरोना लॅबची होवू नये. अन्यथा आम्हाला मान्यता द्या. कारण पडवे कॉलेजमध्ये केवळ मशनरीची गरज आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या लॅबमध्ये आस्थापना, इमारत यांसह अधिकारी नियुक्त करावे लागणार आहेत. आम्हाला मंजूरी दिली आणि मशनरी उपलब्ध केल्यास 20 दिवसात लॅब सुरु करू. अशाप्रकारे शासकीय व खाजगी तत्वावर राज्यात कोरोना लॅब सुरु आहेत.”

उदय सामंतांनी केली लेखी मागणी
श्री. तेली म्हणाले, “पडवे कॉलेजमध्ये कोरोना लॅब सुरु करण्याचा प्रस्ताव स्वतः पालकमंत्र्यांनी मांडला. तोपर्यंत हा विषय आला नाही. दुसर्‍या दिवशी यासाठी बैठक घेण्याचे ठरले; पण ती बैठक अद्याप झाली नाही. उलट दुसर्‍या दिवशी पालकमंत्री गोवा सरकारशी बोलणी करायला गेले. कुडाळ येथे गोव्यात चाचणी होणार असल्याचे जाहीर केले. उदय सामंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री असेल तरी ही लॅब रत्नागिरी जिल्ह्यात व्हावी, अशी त्यांनीच लेखी मागणी केली आहे. ते पत्र आपल्याजवळ आहे. आमची मदत करण्याची प्रामाणिक इच्छा आहे; पण पालकमंत्री राजकारण करीत आहेत.”


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitesh rane press conference in sindhudurg