ऑनलाईन शिक्षण चांगलेच ; पण शिक्षण खात्याने आधी याचा विचार केलाय का?

मिलिंद देसाई
Tuesday, 26 May 2020

फास्ट नेटवर्किंग, आधुनिक फोन, सुरळीत वीजपुरवठा आदींची समस्या विद्यार्थ्यांना जाणवत आहे.

कोरानाच्या संकटामुळे शिक्षण खात्याने ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत का, याचा विचार होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचा पर्याय निवडला, तरी यासाठी पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत का, याची चाचपणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय फास्ट नेटवर्किंग, आधुनिक फोन, सुरळीत वीजपुरवठा आदींची समस्या विद्यार्थ्यांना जाणवत आहे. तरीही सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना आधुनिकतेची कास धरण्याची संधी मिळाली आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर 
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यापूर्वी किती विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आहेत, याची माहिती संकलीत करण्याच्या सूचना शिक्षण खात्याने केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील 60 टक्‍क्‍याहून अधिक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला, तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. शहरांतील खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांनी वेगवेगळ्या ऍपचा वापर करुन विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पालक व विद्यार्थ्यांत गोंधळ निर्माण होत आहे. 

हे पण वाचा - डॉ. मीनाक्षी गजभिये वाटेतच अडकल्या, कोल्हापूरचा कार्यभार सोडल्याने पंचाईत 

शिक्षण खात्याकडून प्रशिक्षण 
ऑनलाईन शिक्षण कशाप्रकारे देण्यात यावे, यासाठी डाएटच्या माध्यमातून आठवी ते नववी व पहिली ते दहावीच्या शिक्षकांना एक दिवसाचे प्रशिक्षण दिले आहे. तर लवकरच पुन्हा एकदा प्रशिक्षण दिले जाईल. ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण खात्याने नवे ऍप विकसीत केले आहे. मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना नोडल अधिकारी प्रशिक्षण देत आहेत. सध्या प्रत्येक विभागातील 40 शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहेत. प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांवर इतर शिक्षकांना शिकविण्याची जबाबदारी असेल. 

हे पण वाचा - ... फक्त एवढेच शेतकरी ठरणार कर्जमाफीस पात्र ; या आहेत अटी
 

अनेकविध ऍप उपलब्ध 
ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे संधीचा लाभ उठविण्यासाठी अनेकांनी नवनवीन सॉफ्टवेअर निर्माण केले आहेत. तर अनेक मोठ्या कंपन्यांनीही ऍप बाजारात आणले असून नव्या सॉफ्टवेअर किंवा ऍपमध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, हे शाळांना पटवून देण्याचा प्रयत्न अनेकांकडून सुरु आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर शिक्षक शाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतात. सध्या 15 हून अधिक ऍपचा वापर ऑनलाईन शिक्षणासाठी होत असून काही शाळांनी व्हॉट्‌सऍप ग्रुप बनवून माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्याची पद्धत अलीकडे आपल्याकडे रुढ झालेली दिसत आहे. परंतु, आपल्या विद्यार्थ्यांना याची फारशी सवय नसल्यामुळे ते गांभीर्याने याचा अभ्यास करताना दिसत नाहीत. विद्यार्थ्यांनी आता याची सवय करून घेणे आवश्‍यक आहे.
 
-रणजीत चौगुले, सहशिक्षक, सरदार्स हायस्कूल, बेळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student Problems facing online education