एक्‍साईजच्या तडजोडीमुळेच सावंतवाडीत दारू खुलेआम : संजू परब

Open sale of Goa made liquor Officials of District Foreign Liquor Dealers Association meet Mayor Parab in the hall of the corporation
Open sale of Goa made liquor Officials of District Foreign Liquor Dealers Association meet Mayor Parab in the hall of the corporation

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : गोवा बनावटीच्या खुलेआम दारू विक्रीमुळे जिल्ह्यातील महसूल गोव्याला जात आहे. जिल्ह्यातील अनेक तरुण अवैध व्यवसायाकडे वळत आहेत. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीच जबाबदार असून त्यांच्याकडून तडजोड होत असल्यानेच अवैध दारू विक्री खुलेआम होत आहे, असा आरोप येथील नगराध्यक्ष संजू परब यांनी केला.


पोलिसांवरही त्यांनी आरोप केले. तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना यांचा आदर्श घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी उचित कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या विरोधातच गावागावात आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशाराही श्री. परब यांनी दिला.येथील पालिकेच्या सभागृहात जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष परब यांची भेट घेत अवैध दारू विक्रीबाबत नगराध्यक्ष परब यांनी उठविलेल्या आवाजाबाबत संघटनेच्यावतीने पाठिंबा दिला. यावेळी आयोजित बैठकीत बोलताना नगराध्यक्षांनी हा इशारा दिला.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, भाजपचे शहर मंडल उपाध्यक्ष अजय गोंधावळे, जिल्हा सरचिटणीस निशांत तोरस्कर, केतन आजगांवकर, जितू पंडित, संतोष कुलकर्णी, महेश कुमठेकर, रवि शेट्टी, प्रथमेश म्हाडेश्‍वर, जॅकी डिसोजा, डेनीस डान्टस, रेमी आल्मेडा, विनेश तावडे, महेश नार्वेकर, आंतोन रॉड्रीक्‍स, सुभाष मर्ये, आनंद गवंडे, अवधूत शिरसाट, सागर कुशे, संदीप जगताप, रोहन शिरसाट, रमाकांत आचरेकर, नागेश मसुरकर, सर्वेश पाटकर, दीपक भोगले, विठ्ठल मोरये, ज्ञानेश्‍वर पारकर, उत्तम धुमाळे, संतोष गावडे, दीपक बेलवलकर, अमोल सुगरण, अमित बांदेकर, विजय गोंधावळे, अविनाश सामंत यांसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात गल्लीबोळात सफाई कामगारांना सापडणाऱ्या अवैध दारुच्या बाटल्यांचा खच व या अवैध धंद्यात ओढले जाणारे शहरातील तरुण या पार्श्‍वभूमीवर अवैध दारु विक्री तत्काळ बंद करावी, अन्यथा पोलिस अधिक्षकांना दारुच्या बॉटल कुरिअर करण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी श्री. परब यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा मद्य विक्रेता संघटनेने नगराध्यक्ष परब यांची भेट घेत चर्चा केली.यावेळी मद्य विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. गाड यांनी नगराध्यक्ष परब यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांचे जाहीर अभिनंदन करत आभार व्यक्त केले.

कोरोना  रोगाच्या पार्श्‍वभूमीवर परमिट धारक व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. याचा फायदा उठवत गोवा बनावटीची अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परमिटधारक दारू विक्रेत्यांचा धंदा सद्यस्थितीत 80 टक्‍क्‍यांवरून केवळ 10 टक्‍क्‍यांवर आला आहे. या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी आम्ही महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी केली होती. अवैध दारू विक्रेत्यांची यादीही पोलिसांना सुपूर्द केली होती;

मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता आम्ही एकत्र आलो व आवाज उठविल्याचे कळल्यानंतर उलट आमच्यावरच केसेस सुरू होतील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली; मात्र आता मागे हटणार नसून श्री. परब यांच्या लढ्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
 

अवैध दारू विक्रीवर आळा आणणार
लॉकडाऊनच्या काळात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे कटू सत्य आहे. आपण स्वतः अशा काही अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे; मात्र ही कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येईल. येथील अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यात येईल, अशी ग्वाही या बैठकीला उपस्थित येथील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली.
 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com